जेएनएन, मुंबई. राज्यात मागील काही दिवसांत पावसाने काही उसंत दिली होती. मात्र पुन्हा राज्यात पाऊस सक्रिय होणार आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे.
मागील काही दिवसांत मराठवाड्यासह अनेक भागात पावसाने हाहाकार उडवला होता. या पावसामुळे अनेक भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लाखो हेक्टरवरील पिके ही पाण्याखाली गेली आहेत. यातच आता मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत आणि विदर्भात हवामान विभागाने पुन्हा पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
राज्यात विदर्भात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. उद्या - सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तर 12 सप्टेंबर रोजी म्हणजे शुक्रवारी अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशीव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यात पावसामुळे 50 जणांचा मृत्यू
मराठवाड्यात या पावसाळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे किमान 50 जणांना आपले प्राण गमवावे लागले आणि पाच लाख हेक्टरपेक्षा जास्त जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले, ज्यामध्ये नांदेड हा सर्वाधिक प्रभावित जिल्हा ठरला आहे.