जेएनएन, सोलापूर. Solapur Success Story: ही गोष्ट आहे सोलापुरातील. इथं गवळी वस्ती भागातील झोपडपट्टीत पत्र्याच्या सेडमध्ये एक कुटूंब राहतं. वडिल छोटा गॅरेज व्यवसाय करतात. त्यावर कुटूंबातील सहा जणांचा उदरनिर्वाह चालतो. जोतिराम भोजने यांना संजीवनी आणि सरोजिनी या दोन मुली आहे. 

कष्टाचं सोनं केलं

घरची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही जोतिराम यांनी छोट्या गॅरेज व्यवसाय चालवत त्यांना मुलींना शिक्षण दिलं. वडिलांनी काबाड कष्ट करुन शिकवलेल्या संजीवनी आणि सरोजिनी यांनी त्याच्या कष्टाचं सोनं केलं आहे. त्यांनी असेल त्या परिस्थितीत अभ्यास करुन MPSC परीक्षेत यश मिळवले आहे.

मुलींना शिक्षण

संजीवनी आणि सरोजिनी भोजने अशी एमपीएसी परीक्षेत यश मिळवलेल्या त्या दोन सख्ख्या भगिनींची नावे आहेत. तर गरीब परिस्थितीतून मुलींना शिक्षण देणारे ज्योतीराम आणि रेश्मा भोजने अशी आई-वडिलांची नावे आहेत.

वडिलांनी शिकवल्यानेच यश मिळाले 

    जोतिराम भोजने यांनी पाचवी पर्यंत शिक्षण घेतले असून गॅरेज चालक अशी वडीलांची ओळख आहे. घरची गरीब स्थिती असताना देखील वडिलांनी शिक्षण शिकवल्यानेच हे यश मिळाले असल्याच्या भावना संजीवनी आणि सरोजिनी यांनी व्यक्त केल्या आहेत. 

    दररोज किमान 6 ते 7 तास अभ्यास 

    घरची परिस्थिती हलाकीची असतानाही दोघी भगिनींनी बीकॉम पर्यंत शिक्षण पूर्ण केले. 2018 पासून दोन्ही भगिनींनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली. दररोज किमान 6 ते 7 तास सोलापुरात अभ्यास करुन त्यांनी या परीक्षेत यश मिळवलं. काल महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचा निकाल हाती आल्यानंतर त्यांना ही आनंदाची बातमी समजली.

    दोघींना मिळाली पोस्टिंग

    यामध्ये संजीवनी भोजने यांना मंत्रालयात महसूल सहाय्यक तर सरोजणी भोजने यांना कर सहाय्यक म्हणून पोस्टिंग मिळाली आहे. त्यामुळे सध्या भोजने कुटुंबियांचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे. अतिशय हलाकीच्या परिस्थितीतून या दोन भगिनींनी मिळवलेल्या या यशाच सोलापूरमध्ये सर्वत्र कौतुक होत आहे.