जेएनएन, मुंबई. पुण्यात आज विद्यार्थी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार सहभागी झाले आहेत.
रोहित पवारांची माहिती
आक्रोश मोर्चासाठी MPSC चे विद्यार्थी पुण्यात ओंकारेश्वर मंदिराजवळ मोठ्या प्रमाणात जमले आहेत. याचवेळी काहीसा पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आलाय, मात्र विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील उज्ज्वल भविष्याचं छत्र हिरावण्याचा काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचा प्रयत्न असून तो हाणून पाडण्यासाठीचा आमचा हा लढा आहे. त्यामुळं पाऊस आला तरी हा आक्रोश मोर्चा विराट होणार आहे. मीही त्यासाठी पुढच्या काही मिनिटातच पोचतोय. हा मोर्चा संविधानिक मार्गाने झाला पाहिजे यासाठी आमचं पोलीस प्रशासनाला संपूर्ण सहकार्य असेल आणि पोलिसांचंही असंच सहकार्य राहील, ही अपेक्षा!, अशी माहिती रोहित पवार यांनी ट्वीट करून दिली आहे.
सुप्रिया सुळे आंदोलनात सहभागी
MPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी एक प्रचंड 'आक्रोश मोर्चा' काढला. आंदोलक विद्यार्थ्यांशी एकता दर्शवण्यासाठी NCP-SP च्या खासदार सुप्रिया सुळे या आंदोलनात सहभागी झाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "महाराष्ट्रातील आपल्या मुलांना आज आंदोलन करावे लागत आहे, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आजचे वातावरण पाहून जंतरमंतरवर तरुणांनी केलेल्या आंदोलनाची आठवण येते. मी महाराष्ट्र सरकारला नम्र विनंती करते की, त्यांनी एखादा जबाबदार प्रतिनिधी पाठवावा; आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करू. पण संवाद होणे गरजेचे आहे..."
कोल्हापुरात आक्रोश मोर्चा
MPSC ची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या (पेपर लीक) घटनेचा निषेध करण्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांनी कोल्हापुरातील दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या पेपर फुटीसाठी जबाबदार धरत, विद्यार्थ्यांनी MPSC अध्यक्षांना पदावरून हटवण्याची आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
परीक्षा पारदर्शक करण्याची विद्यार्थ्यांची मागणी
MPSCच्या विविध परीक्षांबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित होत आहेत. पेपरफुटी, परीक्षा प्रक्रियेतील अनियमितता आणि कथित गैरप्रकारांमुळे प्रामाणिकपणे अनेक वर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे परीक्षा प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली.
पेपरफुटी किंवा परीक्षेतील गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी, दोषींना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घालू नये आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी ठोस यंत्रणा उभी करावी, अशी मागणी मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.
