जेएनएन, सोलापूर: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील शाळांना आज सुट्टी जाहीर (Solapur School Holiday) करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने परिपत्रक काढत हा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

कोणत्या भागातील शाळांना सुट्टी?

सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर ग्रामीण, माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी आणि दक्षिण सोलापूर या तालुक्यांतील नगरपरिषद आणि जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना दिलासा मिळाला आहे.

36 जणांना सुरक्षित स्थळी हलविले

माढा तालुक्यातील रिधोरी गावातील पुरात अडकलेल्या 8 लोकांना व्यवस्थित सुखरूप बाहेर काढले व इतर 28 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.

अतिवृष्टीमुळे अडचणी!

    गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सलग पाऊस सुरू आहे. ग्रामीण भागातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून, काही ठिकाणी वाहतुकीत अडथळे निर्माण झाले आहेत. नदी-नाल्यांना पूर आल्याने विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना धोका निर्माण होऊ शकतो, याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे.

    विद्यार्थ्यांची सुरक्षितता प्रथम

    विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही आमची प्राथमिक जबाबदारी आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक धोका टाळण्यासाठी ग्रामीण भागातील शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

    शाळांना सुट्टी जाहीर 

    सोलापूरसह धाराशीव, बीड जिल्ह्यातही काही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसाने अनेक रस्ते, पुल हे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे विद्यार्थांची सुरक्षितता लक्षात घेऊन शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.