पुणे. local body elections : जिल्ह्यात आज महायुतीच्या प्रचाराचा जोरदार धडाका लागला आहे.नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या प्रचाराचा हा शेवटचा दिवस असल्याने फडणवीस-शिंदे-पवार त्रिकुटाच्या तुफानी सभा जिल्हाभर गाजणार आहेत. आज प्रचार थांबणार असल्याने सर्वच पक्षांनी पूर्ण ताकदीनं मैदानात उतरायची रणनीती आखली आहे. मात्र महाविकास आघाडीतील पक्ष शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटांचा संथ गतीने प्रचार सुरू आहे. मात्र काँग्रेस पक्ष प्रचारपासून दूरच दिसत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा भोरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज चाकण आणि जुन्नर येथे प्रचारसभांना संबोधित करणार आहेत. दोन्ही नेत्यांच्या सभांना मोठी गर्दी अपेक्षित असल्याने पोलिस आणि प्रशासनानंही खास तयारी केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज पुणे जिल्ह्यात विशेष दौरा असून, ते राजगुरूनगर, चाकण आणि आळंदी येथे सलग तीन सभा घेणार आहेत. अलीकडच्या काळात अजित पवार यांचा पुण्यातील प्रभाव वाढल्याचं चित्र आहे. त्यामुळे महायुतीच्या प्रचारात पवार यांची उपस्थिती महत्त्वाची मानली जात आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी चुरशीची लढत असून मतदानापूर्वी शेवटच्या दिवशी वातावरण तापवण्याचा पक्षांचा प्रयत्न आहे.
दरम्यान, नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार आज रात्री अधिकृतरीत्या बंद होणार आहे. उद्या सकाळी 7:30 वाजता मतदानास सुरुवात होईल. ३ डिसेंबर रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर केले जाणार आहे.
