एजन्सी, कोल्हापूर. Kolhapur News: कोल्हापूरमधील शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथे ग्रामदैवत श्री कल्याणताई माता देवीच्या यात्रेतील महाप्रसादामुळे गावातील सुमारे 250 ते 300 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.
मध्यरात्री पोटदुखी, जुलाब आणि उलट्याचा त्रास
शिवनाकवाडी (ता. शिरोळ) येथे मंगळवारी ग्रामदैवत श्री कल्याणताई माता देवीची यात्रा पार पडली. यात्रेनिमित्त दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा प्रसाद खाल्यानंतर मध्यरात्रीनंतर काही जणांना पोटदुखी, जुलाब आणि उलट्याचा त्रास सुरू झाला. पहाटेपर्यंत हा त्रास वाढल्याने अनेकांना आरोग्य केंद्रात दाखल करण्याची वेळ आली.
रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेची धावपळ
अचानक मोठ्या संख्येने रुग्ण वाढू लागल्याने शिवनाकवाडी परिसरासह इचलकरंजी व काही खाजगी रुग्णालयांत रुग्ण दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार सुरू असतानाच बाधितांची संख्या वाढल्याने इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात 100 जणांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आला. बाधितांमध्ये लहान मुले, महिला, पुरुष आणि वृद्धांचा समावेश आहे.
आमदारांचा दौरा, परिस्थितीचा आढावा
घटनेची माहिती मिळताच शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली आणि त्यांची विचारपूस केली. रुग्णालय प्रशासनाला रुग्णांना तातडीने योग्य उपचार देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
सध्या रुग्णालयात 50 हून अधिक जणांवर उपचार सुरू
रुग्णालयात 50 हून अधिक जणांवर उपचार सुरू होते आणि उर्वरितांना घरी सोडण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले, तसेच दाखल झालेले सर्व रुग्ण स्थिर असल्याचेही त्यांनी सांगितले. (Kolhapur food poisoning)
अन्नाचे नमुने फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवले
प्रशासनाकडून महाप्रसादातील अन्नाचे नमुने तपासणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. अन्न विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.