कोल्हापूर. Kolhapur Municipal Election Result 2026: कोल्हापूरची निवडणूक तब्बल 10 वर्षानंतर होत असल्याने याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. कोल्हापूरची सत्ता मिळवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी करत काँग्रेस नेते सतेज पाटील यांना घेरलं होतं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री कोल्हापुरात तळ ठोकून होते. मात्र सर्व शक्ती पणाला लावूनही महायुतीला कसेबसे काठावरचं बहुमत मिळालं आहे. महायुतीचा एकट्याने सामना करणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना चांगलात घाम फोडला. कोल्हापूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी एकहाती मैदान मारत तब्बल 37 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसची आघाडी असलेल्या शिवसेना ठाकरे गटाला केवळ एकच जागा जिंकता आल्याने कोल्हापूरची सत्ता काँग्रेसच्या हातातून निसटली. त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी केवळ ३ जागा कमी पडल्या.
कोल्हापुरात सतेज पाटलांचेच वर्चस्व -
कोल्हापूर महापालिकेच काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. काँग्रेसने तब्बल 37 जागांवर विजय मिळवत आपला दबदबा कायम ठेवला आहे तर भाजपच्या खात्यात २४ जागा गेल्या. शिवसेना शिंदे गट 14 जागांवर राहिला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 4 जागा मिळाल्या. जनसुराज्यने एक जागा जिंकली तर ठाकरे गटाला एक जागा मिळाली. विशेष म्हणजे कोल्हापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एकही जागा मिळाली नाही.
महायुतीने कोल्हापुरात प्रचाराचे रान उठवले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दिग्गज नेते प्रचारात उतरले होते. मात्र इतकी ताकद लावूनही सतेज पाटील यांनी काँग्रेससाठी एकहाती मिळवलेलं यश लक्षणीय आहे. कोल्हापूर महानगरपालिका आणि ही अशी एकमेव महापालिका होती ज्या ठिकाणी महायुतीतील सर्व घटक पक्ष एकत्र निवडणूक लढत होते. काँग्रेसने 81 पैकी 75 जागांवर उमेदवार होते. यामध्ये काँग्रेसचे 37 उमेदवार विजयी झाले.
शारंगधर देशमुख यांचा विजय सतेज पाटलांना धक्का -
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक नऊमधील लढत सर्वाधिक हायव्होल्टेज लढत म्हणून ओळखली जात होती. यात शिवसेना शिंदे गटाचे शारंगधर देशमुख विजयी झाले. हा सतेज पाटील यांना झटका मानला जात आहे. कारण शारंगधर देशमुख यांनी सतेज पाटलांची साथ सोडून शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांना पराभूत करण्याचा सतेज पाटलांनी चंग बांधला होता. येथे काँग्रेसचे राहुल माने पराभूत झाले. दुसऱ्या एका लक्षवेधी लढतीत कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा चिरंजीव ऋतुराज विजयी झाले. त्यांनी अपक्ष उमेदवार विजय साळोखे यांचा पराभव केला. आमदारपुत्र विरुद्ध रस्त्यावरील कार्यकर्ता असे स्वरुप या लढाईला होते.
