मुंबई. BMC Election Result 2026: महापालिकांचे निकाल हाती येत असून मुंबईत भाजपा आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळत आहे.  मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली व निकालाचे कल यायला हळूहळू सुरूवात झाली. मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी जवळपास 52.94 टक्के मतदान झाले आहे. मतांचा टक्का वाढल्याने भाजपला धडकी भरली आहे. त्यातच काल समोर आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार मुंबई महापालिकेत भाजपला मोठे यश मिळताना दिसत आहे.

एक्झिट पोलनुसार भाजप आणि शिंदे यांच्या महायुतीला 138 जागा मिळणार आहेत. त्याचवेळी ठाकरे बंधू आणि पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 62 जागा मिळतील असं म्हटलंय. दुसरीकडे, काँग्रेस आणि वंचित आघाडीला 20 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. 

भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने जोरदार सुरुवात केली आहे. 

पहिल्या एका तासात भाजप 26, शिंदेंची शिवसेना 15, शिवसेना ठाकरे बंधू 54, काँग्रेस 5, तर इतर 3 जागांवर आघाडीवर आहे. मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 114 जागांची गरज आहे. हा आकडा कोण गाठणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

ठाकरे बंधूंची जोरदार फाईट -

तब्बल 20 वर्षांनी एकत्र येत ठाकरे बंधूंनी मुंबई महानगरपालिकेत महायुतीला कडवी झुंज दिली आहे. ठाकरे बंधूंच्या युतीला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्रित ताकद मुंबईत दिसत आहे.