पुणे. Ketan Agarwal Murder Case: पुण्यातील बिल्डर केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात नवनवे खुलासे होत आहेत. त्याला कोणी ढकलले, कोठे प्लॅन केला यासोबतच आता समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी सिया गोयल हिला केतनचे टक्कल असणे खटकत होते. केतन डोक्यावर केसांचा विग वापरत असल्याचे तिने म्हटले आहे, मात्र याबाबत दुसरे कोणालाच माहिती नाही. त्याच्या टक्कल असल्यामुळेच सियाची केतनसोबत लग्न करण्याची इच्छा नव्हती. त्यातच तिचा जीव चेतन चौधरीवर जडला होता आणि त्यांच्या मार्गात केतन अडथळा ठरत होता. यामुळे त्याचा कायमचा काटा काढण्याचा कट दोघांनी मिळून रचला.
पुण्यातील बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा असलेल्या केतन अग्रवाल याचा लोहगडावरून पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात वाटत होता. मात्र त्यानंतर त्याची हत्या भावी पत्नी सिया गोयल आणि तिच्या प्रियकराने मिळून केल्याचे समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ माजली. या हायप्रोफाईल प्रकरणात पोलीस चौकशीदरम्यान सातत्याने नवीन खुलासे होत आहेत. सिया गोयल हिला केतन अग्रवाल याच्याशी लग्न करायचे नव्हते. त्यामुळे तिने प्री वेडिंश शूटही काहीतरी बनाव करून रद्द केले होते. सियाला केतन मनापासून कधीच पसंत पडला नाही. त्याच्या व्यक्तिमत्त्वातील दोन उणीवा सियाला खटकायच्या. केतनला टक्कल होते. तो केसांचा टोप वापरत होता. त्याचबरोबर बोलताना तो खडखळायचा. याची माहिती गोयल कुटूंबाला होती मात्र त्यांना याचे विशेष काही वाटले नाही. मात्र सियाला टकला केतन नवरा म्हणून कधीही नको होता. तिचे चेतनवरच प्रेम होते.
केतनची ट्रेकिंगची आवड हेरली आणि संपवले -
सियाला माहिती होते की, केतनला ट्रेकिंगची प्रचंड आवड होती. हीच बाब सिया आणि चेतन यांनी आपल्या कटासाठी वापरली. अपघात वाटेल अशा ठिकाणी नेऊन केतनला दरीत ढकलून देण्याचा त्यांचा प्लॅन होता. त्यासाठी त्यांनी लोहगड किल्ल्याची निवड केली. सिया आणि चेतनची हत्या करण्यापूर्वी तब्बल तीन वेळा लोहगड किल्ल्यावर जाऊन रेकी केली होती. किल्ल्यावरील खोल दऱ्या, निर्जन ठिकाणांची पाहणी केली होती.
केतनची हत्या करण्याऐवजी तू घरच्यांना सांगून सरळ लग्नाला नकार का दिला नाहीस किंवा चेतनसोबत पळून का गेली नाहीस, या प्रश्नावर सिया गोयल म्हणाली की, तिला कुटुंबीयांना दुखवायचे नव्हते. हे लग्न मोडले असते तर कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीला मिळाली असती. त्यापेक्षा केतनला मार्गातून कायमचा दूर करणे, हा पर्याय तिने निवडला.
