पुणे. Jejuri Accident: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांवर काळाने घाला घातला. जेजुरी परिसरात पालखी मार्गावर एका ट्रकने वारकऱ्यांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. या भीषण अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे 20 वारकरी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवड–जेजुरी मार्गावरील दिवे घाट परिसरातून मार्गस्थ होत असताना ट्रकने मागून वारकऱ्यांना धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, या भीषण अपघातात तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून 20 वारकरी गंभीर जखमी झाले आहेत.

माहितीनुसार, संबंधित ट्रक चालकाची प्रकृती अचानक बिघडल्याचे सांगण्यात येत आहे. चालकाने तापासाठी औषधांच्या गोळ्या घेतल्या होत्या. त्यानंतर त्याला डुलकी आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक थेट वारकऱ्यांच्या गर्दीत घुसला. काही क्षणांतच घटनास्थळी गोंधळ उडाला.

अपघातानंतर उपस्थित वारकरी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृत महिलांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात हजारो वारकरी सहभागी झाले असताना ही दुर्घटना घडल्याने वारकरी संप्रदायात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून अपघाताच्या कारणांचा अधिक तपशील तपासला जात आहे.