जेएनएन, सांगली. Islampur is now Ishwarpur: सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव आता अधिकृतपणे ‘ईश्वरपूर’ असे करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या भारतीय सर्वेक्षण विभागाकडून यासंदर्भातील मान्यतेचे पत्र महाराष्ट्र शासनाला पाठविण्यात आले आहे.

भारतीय सर्वेक्षण विभागाचे अनुमोदन पत्र प्राप्त झाले असून त्याचबरोबर इस्लामपूरच्या नामांतरावर शिक्कामोर्तब झाले आहे. आता शहराचे अधिकृत नाव ईश्वरपूर झाले आहे.

मंत्री छगन भुजबळ यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या मान्सून अधिवेशनाच्या अंतिम दिवशी घोषणा केली होती की, इस्लामपूर शहराचे नाव बदलून ईश्वरपूर केले जाईल. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर हा  प्रस्ताव केंद्र सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. आता केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर नामांतर कायदेशीररित्या मान्य झाले आहे. 

का बदलले नाव?

इस्लामपूरचे नाव बदलण्याची मागणी गेल्या 40-50 वर्षापासून सातत्याने होत होती.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे तत्कालीन इस्लामपुर प्रमुख पंत सबनीस यांनी काही दशकांआधी शहराचे नाव ईश्वरपूर ठेवण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही 1986 मध्ये इस्लामपूरच्या यल्लमा चौकात आयोजित एका सभेत पहिल्यांच सार्वजनिकरित्या शहराला ईश्वरपूर म्हणून संबोधले होते.

अखेर मिळाली मंजुरी!

    इस्लामपूरचे नामकरण बदलण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू होती. स्थानिक पातळीवर ‘ईश्वरपूर’ हे नाव मूळ ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ओळख दर्शवते असा युक्तिवाद सातत्याने केला जात होता. या मागणीसाठी स्थानिक नगरपरिषद, आमदार आणि नागरिकांनी अनेक ठिकाणी ठराव, मोर्चे आणि निवेदनं दिली होती. राज्य सरकारनेही या मागणीला पाठिंबा देत इस्लामपूरचं नाव ‘ईश्वरपूर’ करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. त्यावर केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अखेर भारतीय सर्वेक्षण विभागाने मंजुरीचं पत्र जारी केलं आहे.

    केंद्र सरकारकडून अधिकृत पत्र प्राप्त-

    केंद्राच्या पत्रानुसार, आता सर्व सरकारी नकाशे, शासकीय कागदपत्रे आणि दस्तऐवजांमध्ये “ईश्वरपूर” हेच नाव वापरले जाईल. संबंधित राज्य शासनाला आणि स्थानिक प्रशासनाला याबाबतचे पुढील आदेश जारी करण्यास सांगण्यात आले आहे.