पुणे. गॅसच्या वाढत्या तुटवड्याचा फटका आता पुण्यातील हॉटेल व्यवसायालाही बसू लागला आहे. एलपीजीचा पुरवठा कमी झाल्यामुळे अनेक हॉटेल व्यावसायिकांना हॉटेल सुरू ठेवणे कठीण झाले आहे. पर्यायी उपाय म्हणून चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. काही ठिकाणी इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर करून ग्राहकांना जेवण दिले जात आहे.

शहरातील अनेक हॉटेल्समध्ये सध्या पारंपरिक चुलीचा आधार घेत स्वयंपाक सुरू आहे. हॉटेल बंद ठेवण्यापेक्षा चुलीवर स्वयंपाक करून ग्राहकांची सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न व्यावसायिकांकडून केला जात आहे. मात्र चुलीवर मोठ्या प्रमाणात स्वयंपाक करणे कठीण असल्याने हॉटेलच्या मेन्यू कार्डमध्ये मोठे बदल करावे लागले आहेत.

गॅस उपलब्ध नसल्यामुळे अनेक हॉटेल्समधून काही लोकप्रिय पदार्थ तात्पुरते काढून टाकण्यात आले आहेत. विशेषतः जास्त गॅस लागणारे पदार्थ बनवणे अवघड झाल्याने मर्यादित मेन्यू ठेवण्याचा निर्णय घेतला जात आहे. त्यामुळे ग्राहकांनाही मर्यादित पर्यायांवर समाधान मानावे लागत आहे.

दरम्यान, काही हॉटेल्समध्ये इलेक्ट्रिक शेगड्यांचा वापर वाढला असला तरी त्यालाही मर्यादा आहेत. मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक करताना वीजेवर पूर्णपणे अवलंबून राहणे शक्य नसल्याचे हॉटेल व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे चूल आणि इलेक्ट्रिक शेगड्यांच्या मदतीने कसाबसा व्यवसाय सुरू ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

गॅस पुरवठा लवकर सुरळीत झाला नाही तर हॉटेल व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुण्यातील अनेक हॉटेल व्यावसायिकांनी प्रशासनाकडे गॅस पुरवठा नियमित करण्याची मागणीही केली आहे. दरम्यान, गॅस टंचाईमुळे पुणेकरांना हॉटेलमधील जेवणासाठीही पर्याय मर्यादित होत असल्याचे चित्र सध्या शहरात दिसत आहे.