पिंपरी-चिंचवड Pimpri-Chinchwad News:आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता लग्नसराईवरही दिसू लागला आहे. गॅसच्या तुटवड्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील हजारो लग्नसोहळे संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील दोन महिन्यांत शहरात तब्बल 10 हजार लग्नसोहळे होणार असताना केटरिंग व्यवसायिकांकडे गॅस उपलब्ध नसल्याने अनेक ऑर्डर रद्द करण्याची वेळ आली आहे.
शहरातील सुमारे 450 केटरर्सना गॅसचा तुटवडा भासत असून त्यांनी लग्नातील जेवणाच्या ऑर्डर रद्द करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत वर आणि वधूच्या कुटुंबियांना कळवण्यात येत असल्याने लग्नाचे नियोजन केलेल्या कुटुंबांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे. आनंदाच्या क्षणीच हे संकट उभे असल्याने अनेक कुटुंबांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट पाहायला मिळत आहे.
गॅस उपलब्ध नसल्याने काही केटरर्सना लग्नसोहळ्यांतील जेवण व्यवस्था करणे कठीण होत आहे. त्यामुळे काही कुटुंबांना लग्न पुढे ढकलण्याचा विचार करावा लागत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर लग्नसराईचा हंगाम सुरू होणार असताना ही परिस्थिती निर्माण झाल्याने विवाह सोहळ्यांच्या नियोजनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, काही केटरर्स अतिरिक्त खर्च करून गॅसची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यासाठी त्यांना अधिक पैसे मोजावे लागत असल्याने केटरर्सकडून प्रती थाळीमागे 10 ते 20 टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे लग्नसोहळ्यातील मेजवानीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.
या परिस्थितीचा फटका केवळ लग्नसोहळ्यांनाच नाही तर केटरिंग व्यवसायालाही बसण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील केटरिंग व्यवसायाशी संबंधित सुमारे 45 हजार कामगार या क्षेत्रावर अवलंबून आहेत. गॅसचा तुटवडा कायम राहिल्यास त्यांच्या रोजगारावरही मोठे संकट निर्माण होऊ शकते.
यामुळे युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता सर्वसामान्यांच्या आयुष्यातील आनंदाच्या क्षणांवरही होत असल्याचे चित्र दिसत असून लग्नसराईवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.
