जेएनएन, सांगली. शहरातील रखडलेल्या आणि निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांच्या कामांवरून सांगली महापालिकेविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) नगरसेवकांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. विश्रामबाग परिसरातील आलदर चौक ते स्फूर्ती चौक या मार्गावरील रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून प्रलंबित असल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी थेट रस्त्यावर उतरून धरणे आंदोलन केले. आंदोलनादरम्यान महापालिकेच्या निष्क्रिय कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असून, जे काम झाले आहे तेही निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. 

विश्रामबाग परिसरातील हा महत्त्वाचा मार्ग असल्यामुळे दररोज हजारो नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खड्डे, धूळ आणि अर्धवट कामामुळे वाहतुकीवर परिणाम होत असून अपघातांची शक्यता देखील वाढली आहे, असा आरोप केला आहे. 

तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा

यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी महापालिकेला इशारा देत सांगितले की, येत्या आठ दिवसांत रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. तसेच ‘रस्ता रोको’ करून प्रशासनाला धडा शिकवला जाईल, असा इशाराही देण्यात आला. 

दरम्यान, या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. आता महापालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते आणि कामाला गती देते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.