जेएनएन, मुंबई. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या निधनाला दोन महिने पूर्ण झाल्यानिमित्त त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी भावनिक पोस्ट केली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या संदेशात “दादा” म्हणून संबोधत त्यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

मन अजूनही त्यांच्या आठवणींमध्ये गुंतलेले

संदेशात म्हटले आहे की, काळ पुढे सरकत असला तरी मन अजूनही त्यांच्या आठवणींमध्ये गुंतलेले आहे. प्रत्येक क्षणी त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवते, मात्र त्याचवेळी दैनंदिन राजकीय आणि सामाजिक कामकाजात त्यांचे अस्तित्वही जाणवत राहते.

ते केवळ नेते नव्हते तर ते  आधारस्तंभ

या भावनिक पोस्टमध्ये त्यांच्या लोकाभिमुख आणि विकासाभिमुख नेतृत्वाचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. सर्वसामान्यांशी असलेला जिव्हाळा, कामासाठीची झपाटलेली वृत्ती आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णयक्षमता ही त्यांची वैशिष्ट्ये असल्याचे नमूद करण्यात आले. “ते केवळ नेते नव्हते, तर अनेकांच्या आयुष्यात विश्वास, बळ आणि आशा निर्माण करणारे आधारस्तंभ होते,” असेही यात म्हटले आहे. 

तसेच, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांवर चालणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराची वाटचाल त्यांच्या प्रेरणेनेच सुरू असल्याचे सांगत, पुढील निर्णय घेताना “ते असते तर काय केले असते” हा विचार कायम मनात ठेवला जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

    त्यांच्या अनुपस्थितीत निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही, अशी खंत व्यक्त करताना, त्यांनी दिलेली शिकवण, विचार आणि मूल्ये हेच पुढील वाटचालीचे मार्गदर्शक ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. त्यांच्या आठवणी आणि शब्दांमधूनच पुढे जाण्याची ऊर्जा मिळत असल्याचेही यात अधोरेखित करण्यात आले आहे. 

    दरम्यान, या पोस्टमुळे कार्यकर्त्यांमध्येही भावनिक वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांनी दिवंगत नेते अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.