विनोद राठोड, पुणे. Devendra Fadnavis On Pune Traffic: पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासाठी सर्वंकष गतिशीलता योजना सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने निश्चित करावी. ग्रेड सेपरेटर्स, रिंग रोड आणि टनेल्सबाबत एकत्रित आराखडा तयार करावा. पुढील 30 वर्षांचा विचार करून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

पुणे येथील गतिशीलता योजना 1 लाख 30 हजार कोटी रुपयांची असून, पहिल्या टप्प्यात 62 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करावी. या नियोजनानुसार, पहिल्या टप्प्यात सार्वजनिक वाहतुकीचा वापर 30 टक्क्यांपर्यंत आणि त्यानंतर 50 टक्क्यांपर्यंत नेण्याचे ध्येय ठेवावे. कोणत्याही व्यक्तीला 500 मीटरच्या अंतरावर सार्वजनिक वाहतूक सेवा उपलब्ध होईल, याप्रमाणे नियोजन करा, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. सर्व विभागांच्या जबाबदाऱ्या निश्चित कराव्यात. महानगरांमध्ये वाहनांची सरासरी वेगमर्यादा 30 किमी प्रति तास पर्यंत जाईल, याप्रमाणे नियोजन करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

पुणे मेट्रोचे जाळे शहरात निर्माण करून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. पुणे शहर सर्वंकष गतिशीलता योजना आराखड्यात हडपसर ते लोणी काळभोर मेट्रोलाइन प्रस्तावित आहे. पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि पुणे-सोलापूर महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, लोणी काळभोरऐवजी हडपसर ते उरुळी कांचन मेट्रोलाइन असा बदल करण्याबाबत विचार करावा. पुणे व पिंपरी-चिंचवड शहराचे वाढते नागरीकरण आणि त्यासाठी लागणाऱ्या पाणीपुरवठ्याबाबत नियोजन करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.