जेएनएन, मुंबई: संभाजी महाराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराज व सईबाई भोसले यांच्या पोटी 14 मे 1657 रोजी पुरंदर किल्यावर झाला. संभाजी महाराज 2 वर्षाचे असताना त्यांच्या मातोश्री सईबाई यांचा मृत्यू झाला. त्यावेळी पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ या महिलेने त्यांची दुध आई बनून त्यांचे पालन पोषण केले. धाराऊ यांनी शेवटपर्यंत संभाजी महाराजांवर माया केली. राजमाता जिजाबाई भोसले व संभाजी महाराजांच्या सावत्र मातोश्री पुतळाबाई यांनी त्यांच्यावर माया करत त्यांचा सांभाळ केला. राजपुत्र असल्यामुळे संभाजी महाराजांना रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले. अवघ्या 9 वर्षाचे असताना त्यांनी ऐतिहासिक कामगिरी निभावली.
राजपुत्र असूनही संभाजी महाराजांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. संभाजी महाराजांविरोधात त्यांच्याच आई सोयराबाई व स्वराज्यातील कारभारी अण्णाजीपंत दत्तो व इतर कारभाऱ्यांनी त्यांच्या विरोधात कट कारस्थान रचून त्यांना मारण्याचा प्रयत्न देखील केला केवळ हंबीरराव मोहिते यांनी कारभाऱ्यांचा हा डाव उधळून लावला व संभाजी महाराजांचा राज्याभिषेक केला.
अवघे 31 वर्षांचे आयुष्य लाभलेले छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे धाकले धनी म्हणून ओळखले जायचे. छत्रपती संभाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे उत्तमरीत्या राज्यकारभार सांभाळला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर 1681 साली संभाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला होता. शिवाजी महाराजांच्या मृत्युंनतर अनेकांनी संभाजी महाराजांविरोधात कटकारस्थान करत त्यांच्या ऐवजी राजाराम महाराजांचा राज्याभिषेक करण्याचा प्रयत्न केला. परंतु कारभाराच्या हा कट राजाराम महाराजांचे मामा सरसेनापती हंबीरराव यांनी मोडून काढला. छत्रपती म्हणून संभाजी महाराजांनीच स्वराज्याचा कारभार सांभाळावा असे त्यांचे स्पष्ट मत होते. 16 जानेवारी 1681 साली छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर करण्यात आला.
स्वराज्याचे छत्रपती असताना संभाजी महाराजांना व त्यांच्या सरदारांना कोकणातील संगमेश्वर येथे बैठकीसाठी बोलाविण्यात आले होते. संगमेश्वर येथील बैठक संपवून महाराज रायगडाकडे परत येत असताना औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने महाराजांच्या नजीकच्यांच्या मदतीने संगमेश्वरावर हल्ला केला व संभाजीमहाराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत पकडले. औरंगजेबाच्या तावडीतून महाराजांना सोडविण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. संभाजी महाराजांच्या अत्यंत जवळ असणारे त्यांचे मावळे जोत्याजी केसरकर यांनी सर्वात आधी त्यांना सोडविण्याचा प्रयत्न केला त्यांनतर अप्पा शास्त्री यांनी देखील महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला पण हे दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले. औरंगजेबाने संभाजी महाराजांना जीवनदान देण्यासाठी अनेक मागण्या समोर ठेवल्या. परंतु संभाजी महाराजांनी याला स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश दोघांनाही नरक यातना देउन क्रूरपणे अत्यंत हालहाल करून मारायचा आदेश दिला