पुणे/नवाबगंज. उत्तर प्रदेशातील नवाबगंज परिसरातील बरायपूर रामनगर गावात दोन भावंडांच्या घरात जमिनीत पुरलेल्या तीन निळ्या ड्रममधून तब्बल 3 कोटी 20 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. या कारवाईनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या दोघांकडे 80 कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे एवढी अफाट संपत्ती आली कुठून, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. आता या प्रकरणाच्या तपासात पुणे कनेक्शन समोर येत असून, ही कोट्यवधींची रोकड पुण्यातून आणण्यात आली होती का, या दिशेनेही तपास सुरू आहे.
19 वर्षे पुण्यात दागिन्यांच्या व्यवसायात काम
माहितीनुसार, राजेश आणि राकेश ही दोन्ही भावंडे तब्बल 19 वर्षे पुण्यातील एका दागिन्यांच्या व्यवसायाशी संबंधित होती. या काळात त्यांनी एका व्यावसायिकाकडे काम केल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित दागिने व्यावसायिकाच्या ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाल्याचे सांगितले जात आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित व्यावसायिकाने चलनी नोटांचे बंडल पोत्यांमध्ये भरून राजेश आणि राकेश राहत असलेल्या खोलीत लपवून ठेवल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पुढे एका प्रकरणात या व्यावसायिकाला तुरुंगात जावे लागले. याचदरम्यान दोन्ही भावंडे कोट्यवधी रुपयांची रोकड घेऊन आपल्या मूळ गावी परतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
पुण्याहून प्रयागराजपर्यंत रोकड कशी पोहोचली?
या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एवढी मोठी रक्कम पुण्याहून उत्तर प्रदेशातील प्रयागराजपर्यंत कशी आणण्यात आली? रोकड नेण्यासाठी कोणत्या वाहनाचा वापर करण्यात आला? प्रवासादरम्यान एवढ्या मोठ्या रकमेची वाहतूक कोणाच्या लक्षात कशी आली नाही? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहेत.
दोन्ही भावंडांनी ही रक्कम स्वतः आणली होती की त्यासाठी अन्य कोणाची मदत घेतली होती, याचाही तपास होण्याची शक्यता आहे. पुण्यातील संबंधित व्यावसायिक आणि दोन्ही भावंडांमधील आर्थिक संबंधांची माहिती गोळा केली जात आहे.
तीन ड्रममध्ये 3.2 कोटींची रोकड
दरम्यान, बरायपूर रामनगर गावातील घराच्या परिसरात जमिनीत पुरून ठेवलेल्या तीन निळ्या ड्रममधून पोलिसांनी 3 कोटी 20 लाख रुपयांची रोकड जप्त केली होती. चार दिवसांनंतरही या रकमेचा नेमका स्रोत स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे पोलिसांनी आयकर विभागाच्या मदतीने आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू केली आहे.
80 कोटींच्या मालमत्तेचे गूढ काय?
या दोन्ही भावंडांकडे 80 कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यांच्या नावावरील जमीन, घरे, बँक खाती, गुंतवणूक आणि इतर आर्थिक व्यवहारांची माहिती तपासली जात आहे. त्यांच्या उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांच्या तुलनेत ही मालमत्ता किती आहे, याचीही पडताळणी केली जाणार आहे.
पुण्यातील दागिने व्यावसायिकाशी असलेले संबंध, त्याच्याकडे झालेली छापेमारी, रोकड लपवून ठेवल्याची शक्यता आणि त्यानंतर भावंडांनी गावी आणलेली रक्कम या सर्व बाबींचा तपास एकमेकांशी जोडून केला जात आहे.
पोलीस आणि आयकर विभागाच्या तपासाकडे लक्ष
या प्रकरणात पुण्यापासून प्रयागराजपर्यंतच्या आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेणे तपास यंत्रणांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. जप्त केलेली रोकड नेमकी कोणाची आहे, ती कोणत्या व्यवहारातून मिळाली आणि संबंधित भावंडांच्या मालमत्तेचा वैध स्रोत काय आहे, हे तपासातून स्पष्ट होणार आहे.
