विनोद राठोड, पुणे: Ajit Pawar On Cow Vigilantes: पशुधन वाहतुकीत अडथळा आणणाऱ्या गोरक्षकांना आवर घालण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र पोलिसांना दिले आहेत.

"कायदेशीर पशुधन वाहतुकीवर कुठल्याही अनधिकृत ‘विजिलँट’ (vigilante) व्यक्तींनी हस्तक्षेप करू नये. वाहने तपासण्याचा अधिकार फक्त आणि फक्त पोलिसांच्याच हातात आहे. गोरक्षकांनी कायदा हातात घेऊ नये, घेतल्यास पोलिसांनी कारवाई करावी," असे स्पष्ट निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत.

राज्यात सर्क्युलर जारी करणार!

या मुद्द्यावर ठाम भूमिका घेत, अजित पवारांनी राज्याच्या पोलीस महासंचालक (DGP) रश्मी शुक्ला यांना सर्व जिल्ह्यांमध्ये एक सर्क्युलर जारी करण्यास सांगितले आहे. यामध्ये गोरक्षक प्रकारच्या कारवायांना थांबवण्याचे स्पष्ट आदेश असतील.

कुरेशी समाजाची मागणी!

कुरेशी समाजाच्या मागणीनंतर राज्यात सर्क्युलर जारी करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी बैठकीत दिली होती. त्यानंतर राज्यात अधिकृत वाहनधारक आणि परवाना असलेल्या व्यक्तींना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असे पवार म्हणाले. कुरेशी समाजाने पशुवध उद्योगाशी धार्मिक आणि आर्थिक दृष्ट्या संबंधित असलेल्या व्यावसायिकांना आणि शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल तक्रार केली होती. समाजाला संरक्षण देण्याची मागणी अजित पवारांकडे करण्यात आली होती. यावर अजित पवार यांनी सांगितले की, ही व्यावसायिक कुटुंबे महाराष्ट्राच्या कृषी-आधारित अर्थव्यवस्थेचा भाग आहेत, त्यामुळे त्यांना अन्याय सहन करावा लागणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.