जेएनएन, मुंबई. आषाढी वारी 2025: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी बैलजोडीचा मान यंदा घुंडरे घराण्याला मिळाला असून, माऊलीच्या मुख्य संजीवन समाधी मंदिरात या बैलजोडीचे पूजन केल्यानंतर आळंदी नगरीतून ढोल ताशांच्या गजरात या बैलजोडीची मिरवणूक काढण्यात आली आहे.

यंदा घुंडरे घराण्याची बैलजोडी माऊलींचा पालखी रथ ओढणार आहे. विवेक ज्ञानेश्वर घुंडरे, जनार्दन घुंडरे, अर्जुनराव मारुती घुंडरे आणि सचिन बाळासाहेब घुंडरे हे यंदाच्या माऊलींच्या पालखी सोहळ्यातील बैलजोडीचे मानकरी ठरले आहेत. विवेक घुंडरे यांनी सातारा जिल्ह्यातील बावधन या गावातून येथून राजा-प्रधान ही बैलजोडी बाळासाहेब कदम यांच्याकडून सहा लाख रुपयांना खरेदी केली आहे. तसेच दुसरी बैलजोडी सावकार व संग्राम ही हिंजवडी येथून उमेश साखरे यांच्याकडून पाच लाख रुपयांना खरेदी केली आहे. अर्जुनराव मारुती घुंडरे व सचिन बाळासाहेब घुंडरे यांनी नांदेड सिटी, पुणे येथून 5 लाख 51 हजार रुपयांना मल्हार व आमदार ही बैलजोडी निखिल कोरडे यांच्याकडून खरेदी केली, तसेच दुसरी बैलजोडी माऊली व शंभू ही उत्तमनगर येथून मुरलीधर नाणेकर यांच्याकडून 2 लाख 51 हजार रुपयांना खरेदी केला आहे. 

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ सोहळ्यासाठी बैलांकडून शेती मशागत, बैलगाडी ओढणे असा सराव केला जात आहे. या बैलांसाठी खुराक म्हणून शाळूची वैरण, हिरवा चारा, पेंड, खारीक-खोबर्‍याचा भुगा, बैलखाद्य मिक्स आदी देत आहेत. पालखी वाहण्यासाठी वापरण्यात येणारी बैलजोडी ही केवळ वाहतुकीचे साधन नसून, ती वारकरी संप्रदायातील एक गौरवशाली मान मानली जाते. ही निवड अतिशय काळजीपूर्वक आणि धार्मिक भावनेने केली जाते.

या दिवशी पालखी करेल पंढरपूरकडे प्रस्थान 
संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी प्रत्येक वर्षी ज्येष्ठ वद्य त्रयोदशीला (पुण्यतिथीच्या दिवशी) आळंदीहून पंढरपूरच्या आषाढी एकादशी वारीसाठी प्रस्थान करते. 18 जून 2025  (बुधवार) या दिवशी आळंदीतील माऊलींच्या संजीवन समाधी मंदिरात पूजा व धार्मिक विधी होऊन, ढोल-ताशांच्या गजरात आणि लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी प्रस्थान करेल.

अशी केली जाते बैल जोडीची निवड

पारंपरिक घराण्यांना मान

या सेवेसाठी निवड बहुतांश वेळा पिढ्यान्-पिढ्या पालखी सेवेत असलेल्या घराण्यांनाच दिली जाते. यंदा बैलजोडीचा मान घुंडरे घराण्याला मिळाला आहे. या घराण्याने अनेक वर्षांपासून वारीत निस्वार्थ सेवा देत पालखी परंपरा जपली आहे.

शारीरिक ताकद आणि शिस्त
निवड करताना बैलजोडीची शारीरिक क्षमता, सौम्य स्वभाव, आणि वारीच्या लांब प्रवासाला तोंड देण्याची क्षमता यांची कसून चाचणी घेतली जाते. बैलांना वारीपूर्वी विशेष प्रशिक्षण देण्यात येते. शुद्ध आहार, नियमित व्यायाम आणि शांत वातावरण यात त्यांना तयार केलं जातं.

सजावट 
निवड झाल्यानंतर बैलजोडीला पारंपरिक पद्धतीने सजवले जाते. रंगीबेरंगी झूल, घंटा, टिळा आणि पारंपरिक वेश यामधून भक्तीभाव प्रकट होतो. ही सजावट कोणत्याही दिखाव्यापेक्षा श्रद्धा आणि सेवा भावनेला महत्त्व देते.

    पालखी समितीची अंतिम मान्यता
    बैलजोडीची निवड अंतिमतः पालखी सोहळा समिती आणि वारकरी प्रतिनिधींनी एकमताने केली जाते. निवडीत कुठलाही राजकीय हस्तक्षेप नसतो; ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि भावनिक श्रद्धेवर आधारित असते.