जेएनएन, मुंबई. पथविक्रेत्यांच्या उपजीविकेला बळकटी देणे, त्यांना संस्थात्मक कर्जपुरवठ्याची सुविधा उपलब्ध करून देणे आणि डिजिटल आर्थिक समावेशनाला प्रोत्साहन देणे या क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्राने "पीएम स्वनिधी सन्मान पुरस्कार 2026" मध्ये पाच पुरस्कार प्राप्त झाले आहेत. यामध्ये राज्याला दोन पुरस्कार, तर महाराष्ट्रातील तीन नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना कर्जवितरणातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले आहे.

डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभात गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री मनोहर लाल व केंद्रिय राज्य मंत्री तोखन साहू यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्यास पीएम स्वनिधी कर्जवितरणात प्रथम क्रमांक, तर डिजिटल व्यवहारांच्या अवलंबनात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या गटात एक ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत परभणी महानगरपालिकेने कर्जवितरणात प्रथम क्रमांक मिळविला. एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत परळी नगरपरिषदेने प्रथम क्रमांक पटकावला. तर दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत छत्रपती संभाजीनगर महानगपालिकेने तृतीय क्रमांक मिळविला.

राज्य शासन, नगरविकास विभाग, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, नागरी स्थानिक स्वराज्य संस्था, बँकिंग क्षेत्रातील संस्था आणि इतर संबंधित घटक यांनी केलेल्या समन्वित प्रयत्नांमुळे ही कामगिरी साध्य झाली आहे. या सर्वांच्या सहकार्याने योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून पथविक्रेत्यांपर्यंत संस्थात्मक कर्जसुविधा पोहोचविण्यात महत्वपूर्ण योगदान देण्यात आले आहे.

पीएम स्वनिधी योजनेविषयी

पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी ही केंद्रीय क्षेत्रातील योजना असून, केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने जून 2020 मध्ये सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून पथविक्रेत्यांना कोणत्याही तारणाशिवाय परवडणारे खेळते भांडवल कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

    सप्टेंबर 2025 मध्ये योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची पुनर्रचना करून त्याची मुदत मार्च 2030 पर्यंत वाढविण्यात आली. या विस्तारित योजनेत आर्थिक समावेशनासह पथविक्रेत्यांचा सर्वांगीण सामाजिक व आर्थिक विकास साधण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

    योजनेमध्ये वाढीव कर्ज टप्पे, यूपीआयशी संलग्न रुपे क्रेडिट कार्ड, डिजिटल व्यवहारांसाठी प्रोत्साहनपर लाभ, "स्वनिधी से समृद्धी" उपक्रमाच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडणी, तसेच पथविक्रेत्यांची ओळख निश्चित करणे, नोंदणी, क्षमता विकास आणि कौशल्य प्रशिक्षण अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे.

    पीएम स्वनिधी सन्मान पुरस्कार 2026 मधील पाच पुरस्कार हे महाराष्ट्राच्या शहरी पथविक्रेता विकासाच्या प्रयत्नांमधील महत्त्वपूर्ण यश आहे. राज्य शासन आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समन्वित प्रयत्नांतून पथविक्रेत्यांना परवडणारे कर्ज, डिजिटल व्यवहारांच्या सुविधा आणि उपजीविकेच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. शहरी अर्थव्यवस्थेतील पथविक्रेत्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लक्षात घेऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने राज्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत.