सोलापूर. Crime News: प्रेम आंधळं असतं आणि कोणत्याही वयात प्रेम होत असतं असं म्हणतात, प्रेमाला वयाचं बंधन नसतं याची प्रचिती पंढरपुरात आली आहे. वयाच्या सत्तरीत अंगाखांद्यावर नातवंडं खेळवण्याच्या व देवाचं नामस्मरण करण्याच्या वयात दोन वयोवृद्ध जोडप्याचं एकमेकांशी प्रेम जडले. या प्रेमप्रकरणात या ७० वर्षाच्या वृद्धाची हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. सत्तरीतील प्रेमाच्या रक्तरंजित शेवटाने सर्वांनाच धक्का बसला आहे.

प्रेमप्रकरणातून अनेक गंभीर गुन्ह्याच्या घटना घडत असल्याचे आपण दररोज पाहतो. अनैतिक प्रेमसंबंधातून अख्ख कुटुंब उध्वस्त होतं. वयाच्या सत्तरीत फुललेल्या प्रेमाचा रक्तरंजित शेवट झाला आहे. याप्रकरणी, वृद्ध महिलेला अटक करण्यात आली आहे. मंगल होनमाने असं आरोपी वृद्ध महिलेचे नाव आहे. तर अंबादास खांडेकर असं हत्या झालेल्या आजोबाचं नाव आहे.

काय आहे प्रकरण -

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपुरात राहणाऱ्या अंबादास खांडेकर आणि मंगल होनमाने यांचे गेल्या काही वर्षापासून अनैतिक संबंध होते. मात्र, या दोघात वाद झाल्याने मंगल यांनी अंबादास खांडेकर यांची हत्या केली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकला. ही घटना 27 जुलै रोजी घडली. मात्र, 2 ऑगस्ट रोजी अंबादास यांचा जळालेला मृतदेह गावातील लोकांना आढळला. त्यानंतर फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी बोलावण्यात आले. डीएनए रिपोर्ट आल्यानंतर याचा पर्दाफाश झाला.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मंगला व अंबादास पंढरपूर तालुक्यातील एका गावात वारंवार भेटत असत. 27 जुलै रोजी त्यांच्यात एका गोष्टीवरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात मंगलने अंबादासवर हल्ला करून शेतातच त्यांची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिने मृतदेह जाळून टाकला.

गावकऱ्यांना एक मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. तो इतका जळाला होता की त्याची ओळख पटवणे अशक्य झाले. त्यानंतर पोलिसांनी नमुने गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक टीमला बोलावले आणि डीएनए चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. सुमारे दीड महिन्यानंतर जेव्हा डीएनए अहवाल आला, तेव्हा तो मृतदेह बेपत्ता असलेल्या अंबादास खांडेकर यांचाच असल्याचे समोर आले. यानंतर संशयाची सुई मंगल होनमाने हिच्याकडे फिरली व पोलिस तपासात आरोपी वृद्ध महिलेने आपला गुन्हा कबूल केला.