जेएनएन, मुंबई:मुंबईकरांच्या दैनंदिन प्रवासात मोठा दिलासा देणारी समोर आली बातमी आहे. मुंबईतील लोकल तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाला अधिक सुरक्षित, जलद आणि आरामदायी बनवण्यासाठी केंद्र सरकारकडून महत्त्वाची पावले उचलली आहे . प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत स्वयंचलित दरवाजे बंद होणारी (Automatic Door Closing System) प्रणाली असलेल्या नवीन लोकल गाड्या खरेदी केले जात आहे. तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांची क्षमताही वाढवण्यात येणार आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुंबईतील रेल्वे सेवांची क्षमता वाढवण्यासाठी अनेक महत्त्वाचे प्रकल्प सुरू असल्याची माहिती दिली आहे. यामुळे दररोज लाखो प्रवासी वाहतूक करणाऱ्या मुंबई उपनगरी रेल्वे व्यवस्थेला मोठे बळ मिळणार आहे.
सुरक्षिततेवर भर; नवीन लोकल गाड्या
मुंबई लोकलमधील वाढती गर्दी आणि अपघातांच्या पार्श्वभूमीवर स्वयंचलित दरवाजे बंद होणाऱ्या नवीन लोकल गाड्या टप्प्याटप्प्याने सेवेत दाखल केल्या जात आहेत. या गाड्यांमुळे धावत्या लोकलमधून पडण्याचे प्रकार कमी होणार असून प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. तसेच या गाड्यांमध्ये आधुनिक वायुवीजन, प्रवाशांसाठी अधिक आरामदायी आसनव्यवस्था आणि सुधारित ब्रेकिंग सिस्टीमचा समावेश असणार आहे.
मेल-एक्स्प्रेस गाड्यांची क्षमता वाढणार
मुंबईतून देशभर जाणाऱ्या मेल व एक्स्प्रेस गाड्यांमध्ये वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता डबे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे तिकीट उपलब्धता सुधारेल आणि सणासुदीच्या काळात होणारी प्रवाशांची गैरसोय कमी होईल.
हेही वाचा: ठाकरे बंधूंच्या युतीचा फॉर्म्युला ठरला; जागावाटपावर अंतिम बैठक, मुंबईत काही जागांवर त्यागाची तयारी
