नंदुरबार- MPSC Drug Inspector paper leak case: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता नंदुरबारपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणातील आरोपी कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांना मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबारमध्ये आणून तब्बल 14 तास चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. या चौकशीत नेमकी कोणती माहिती समोर आली, याबाबत गुन्हे शाखेकडून कमालीची गुप्तता पाळली जात आहे. मात्र, पाटील यांच्या चौकशीनंतर तपासाला काही नवे धागेदोरे मिळाल्याची चर्चा असून, प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

औषध निरीक्षक पदासाठी 22 मार्च 2026 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या कथित गळतीप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने यापूर्वीच सहा जणांना अटक केली आहे. यामध्ये MPSCचे तीन अधिकारी, कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील तसेच अन्य दोन व्यक्तींचा समावेश आहे. पोलिसांच्या तपासानुसार, परीक्षेपूर्वी गोपनीय प्रश्नसंचातील प्रश्न अनधिकृतपणे मिळवून त्याचा स्वतंत्र संच तयार करण्यात आला आणि तो पुढे काही व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यात आला. 

नंदुरबारमध्ये 14 तास चौकशी-

गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी प्रवीण पाटील यांना नंदुरबारमध्ये आणले. त्यांच्या अकॅडमीशी संबंधित ठिकाणी तसेच इतर संभाव्य ठिकाणी तपास करण्यात आल्याची माहिती आहे. पाटील यांची तब्बल 14 तास चौकशी करण्यात आली. प्रश्नपत्रिकेची कथित देवाणघेवाण, संबंधित व्यक्तींशी संपर्क, आर्थिक व्यवहार, मोबाईलवरील संभाषणे आणि व्हॉट्सअ‍ॅप चॅट याबाबत अधिकाऱ्यांनी माहिती घेतल्याची शक्यता आहे.

पोलिसांनी यापूर्वीच पाटील यांचा मोबाईल, कॉल रेकॉर्ड आणि डिजिटल संवाद तपासण्यास सुरुवात केली आहे. त्यांचे विद्यार्थी, विशेषतः परीक्षेत चांगले गुण मिळवणारे आणि नंदुरबार तसेच आसपासच्या भागातील उमेदवारही तपासाच्या कक्षेत असल्याचे गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

294 प्रश्नांचा संच तपासाच्या केंद्रस्थानी-

    गुन्हे शाखेच्या तपासानुसार, औषध निरीक्षक परीक्षेसाठी तज्ज्ञांनी तयार केलेल्या प्रश्नांपैकी 294 प्रश्न कथितरीत्या परीक्षेपूर्वी मिळवण्यात आले. त्यावरून स्वतंत्र प्रश्नसंच तयार करण्यात आला आणि तो पुढे संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यात आला, असा पोलिसांचा आरोप आहे.

    या प्रश्नसंचाची 22 मार्च रोजी झालेल्या प्रत्यक्ष परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी तुलना करण्यात आली. उपलब्ध तपासाच्या माहितीनुसार, या संचातील 77 प्रश्न आणि त्यांचे पर्याय प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नांशी जुळल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकेतील गोपनीय सामग्री परीक्षेपूर्वीच बाहेर गेल्याचा पोलिसांचा संशय झाला आहे. 

    MPSCच्या तीन अधिकाऱ्यांपासून अकॅडमीपर्यंत कनेक्शन?

    तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, MPSCचे सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नाकाटे यांच्याकडे औषध निरीक्षक परीक्षेच्या समन्वयाची जबाबदारी होती. त्यांनी तज्ज्ञांकडून तयार करण्यात आलेले प्रश्न कथितरीत्या मिळवले. त्यानंतर हे प्रश्न MPSCचे अवर सचिव अभिजित लेंडवे यांच्यापर्यंत आणि पुढे सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे यांच्यापर्यंत पोहोचल्याचा पोलिसांचा आरोप आहे.

    त्यानंतर गोपाळ मराठे यांनी हे प्रश्न कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांच्यापर्यंत पोहोचवल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे. पुढे नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरातील एका फ्लॅटमध्ये प्रश्नसंचाची प्रत एका परीक्षार्थीच्या वडिलांना देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

    पाच लाखांच्या व्यवहाराचा तपास-

    या प्रकरणात पाच लाख रुपयांच्या कथित आर्थिक व्यवहाराचाही तपास सुरू आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रश्न मिळवण्यासाठी पैसे देण्यात आल्याचा संशय असून, या पैशांचा प्रवास कोणकोणत्या व्यक्तींपर्यंत झाला, याची चौकशी केली जात आहे.