कोल्हापूर. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीनंतर महायुती आणि समविचारी आघाडी यांच्यातील राजकीय संघर्ष आता नव्या मुद्द्यावरून पेटण्याची शक्यता आहे. दूध संघाच्या विक्री दरात वाढ करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने या निर्णयाला समविचारी आघाडीच्या संचालकांनी विरोध दर्शवला आहे. ग्राहकांवरील दरवाढीचा बोजा टाकण्यापूर्वी दूध उत्पादक शेतकऱ्यांना खरेदी दरवाढीचा लाभ द्यावा, अशी ठाम भूमिका समविचारी आघाडीने घेतली आहे.
गोकुळ दूध संघातील सत्तासंघर्षाचा परिणाम आता दूध दराच्या धोरणावरही दिसू लागला आहे. निवडणुकीनंतर महायुती आणि समविचारी आघाडी यांच्यातील राजकीय मतभेद कायम असतानाच दूध विक्री दरवाढीचा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे दूध संघाच्या आगामी निर्णयाकडे दूध उत्पादकांसह ग्राहकांचेही लक्ष लागले आहे.
दुसरीकडे, दूध संघाच्या नेतृत्वाकडून विक्री दरवाढीची गरज व्यक्त केली जात आहे. अमूल आणि मदर डेअरीसारख्या दूध उत्पादक कंपन्यांनी विक्री दरात वाढ केल्यानंतर गोकुळच्या दरवाढीची चर्चाही सुरू झाली. संघाच्या आर्थिक स्थितीचा विचार करता विक्री दरात वाढ केल्यास दूध उत्पादकांना खरेदी दरवाढ देणे शक्य होईल, अशी भूमिका सत्ताधारी गटाकडून मांडली जात आहे.
खरेदी दरवाढीचा मुद्दा केंद्रस्थानी
समविचारी आघाडीच्या संचालकांच्या मते, गोकुळचा मुख्य आधार दूध उत्पादक शेतकरी आहेत. शेतकरी दूध उत्पादनासाठी जनावरांचा चारा, पशुखाद्य, औषधोपचार आणि मजुरीवर मोठा खर्च करतात. वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मिळणारा दूध खरेदी दर वाढविणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ ग्राहकांकडून अधिक पैसे घेण्याऐवजी त्याचा योग्य लाभ दूध उत्पादकांनाही मिळायला हवा अशी मागणी केली जात आहे.
दूध विक्री दरवाढीचा निर्णय घेताना दूध उत्पादकांच्या आर्थिक हिताला प्राधान्य द्यावे, अशी मागणी समविचारी आघाडीकडून केली जात आहे. विक्री दरात वाढ करून संघाचे उत्पन्न वाढवायचे आणि त्यातून शेतकऱ्यांना किती दरवाढ द्यायची, याबाबत स्पष्टता असावी, अशीही भूमिका या गटाकडून मांडली जात आहे.
दूध दरवाढीवरून राजकीय संघर्षाला नवे वळण
गोकुळच्या निवडणुकीत समविचारी आघाडीने 25 पैकी 13 जागा जिंकल्या होत्या, तर महायुतीला 12 जागा मिळाल्या होत्या. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडीत महायुतीने बाजी मारली. त्यानंतर शासननियुक्त संचालकांच्या मतदानाच्या अधिकारावरूनही वाद निर्माण झाला. त्यामुळे संघातील सत्तासंघर्ष अद्याप संपलेला नसल्याचे चित्र आहे.
