जेएनएन, नाशिक. जिल्ह्यात आयोजित हिंदू हुंकार सभेत आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी वादग्रस्त विधान केले आहे. घटस्थापनेच्या एक दिवस आदीच नाशिकमध्ये आयोजित हिंदू हुंकार सभेत (Hindu Hunkar Sabha) प्रवीण तोगडिया यांनी गरब्याच्या ठिकाणी मुस्लिमांना नो एंट्री असे वादग्रस्त विधान केले आहे. 

नवरात्र निमित्ताने राज्यात गरब्याचे अनेक ठिकाणी आयोजन केले जातात. मुस्लिमांना गरब्याच्या ठिकाणी प्रवेश न देण्याचे आवाहन तोगडिया यांनी केले आहे. 

जे दुर्गादेवीच्या मूर्तीपूजेला मानत नाहीत, त्यांनी गरब्याला का यावं?असा सवाल तोगडिया यांनी केला. गरब्याच्या कार्यक्रमांमध्ये सर्वांची ओळखपत्रे तपासली जावीत आणि मुस्लिमांना त्याठिकाणी प्रवेश देऊ नये अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. या वादग्रस्त विधानाने धार्मिक सलोख्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सार्वजनिक सणांमध्ये सर्व धर्मीयांचा सहभाग असतो, मात्र तोगडियांच्या विधानामुळे सामाजिक तणाव निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रवीण तोगडिया यांनी काही वर्षांत हिंदुत्ववादी आणि आक्रमक भाषणांमुळे सतत वादाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. 

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेले हे विधान प्रशासनासाठी आणि आयोजकांसाठी नवे आव्हान आहे. या प्रकरणावर स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभागाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही. मात्र, गरबा आयोजक आणि सामाजिक संघटनांनी संयम राखण्याचे आवाहन केले आहे.