Manikrao Kokate : पावसाळी अधिवेशन सुरू असताना राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) सभागृहात मोबाईलवर ऑनलाईन जंगली रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट केल्यानंतर राजकारणात खळबळ माजली व कोकाटे चांगलेच अडचणीत सापडले. सर्व स्तरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली व त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.  जंगली रमी प्रकरण माणिकराव कोकाटे यांचे मंत्रीपद काढून घेणार का? असा सवाल जनतेत होता. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नाराजीनंतर अजित पवारांनीही माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईचे संकेत दिले होते. मात्र नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेत कोकाटे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत राजीनामा देणार नसल्याचे म्हटले आहे. 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कारवाईचे संकेत दिल्यानंतर कोकाटे यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते राजीनामा देतील का? याबद्दल तर्क व्यक्त केले जात होते. मात्र कोकाटे यांनी राजीनामा देण्याबाबत मनात विचारही नसल्याचे स्पष्ट केलं. सभागृहातील ऑनलाइन रमी खेळतानाच्या व्हिडिओवर स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, मी रमी खेळत नव्हतो. मला रमी खेळताही येत नाही. तुम्हाला माहितीच असेल की, रमी खेळण्यासाठी त्या एप्लीकेशनला बँक खाते लिंक असावे लागते. तपास करावा, माझे कोणतेही बँक खाते गेमिंग अॅपला जोडलेले नाही. सभागृहात मी फोन सुरू केला आणि त्यावर गेम सुरू झाला. फोन नवीनच असल्यामुळे मला तो गेम स्किप करता आला नाही. तसेच फोन सुरू करताच काही सेकंद गेम स्क्रीनवर येतात. तेवढ्यात कोणीतरी त्याचा व्हिडीओ चित्रीत केला आणि अधिवेशन संपल्यावर व्हायरल केला. हे प्रकरण इतकं का तापलं हे मला माहिती नाही. 

कोकाटे म्हणाले की, मी सभागृहात रमी खेळलो नाही,  मला रमी खेळताच येत नाही. त्यामुळे माझ्यावरील आरोप बिनबुडाचा आहे. यामुळे राज्यात माझी बदनामी झाली आहे. ज्यांनी कोणी हा व्हिडिओ बनवला त्याला कोर्टात खेचल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशाराही माणिकराव कोकाटे यांनी दिला आहे.

..तरच राजीनामा देणार -

माणिकराव कोकाटे म्हणाले की, मी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, सभापती आणि विधानसभा अध्यक्षांना लेखी पत्र देणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व त्यात जर मी ऑनलाईन रमी खेळत असल्याचे आढळल्यास येत्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपैकी कोणीही निवेदन करावं, त्या क्षणी मी राज्यपालांकडे जाऊन माझ्या कृषीमंत्रीपदाचा राजीनामा देईन, असे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे.