पुणे/संभाजी नगर. Heat wave in Maharashtra: राज्यात उष्णतेची लाट कायम असून मराठवाड्यासह अनेक भाग अक्षरशः तापले आहेत. जालन्यात तापमानाने तब्बल 42 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठल्याने नागरिकांसह जनावरांनाही उकाड्याचा मोठा फटका बसत आहे. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागात जनावरांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करत आहेत.
जालन्यातील अनेक गावांमध्ये गायी आणि म्हशींना उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी त्यांच्या अंगावर पाण्याचे फवारे मारले जात आहेत. काही ठिकाणी गोठ्यांमध्ये स्प्रिंकलर यंत्रणा बसवण्यात आली असून सतत पाण्याची फवारणी करून जनावरांचे शरीर थंड ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पुणे ग्रामीण भागातही उन्हाच्या तीव्र झळांमुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दूध उत्पादनात घट होणे, जनावरांना अशक्तपणा जाणवणे तसेच उष्माघाताचा धोका वाढणे अशा समस्या निर्माण होत असल्याचे पशुपालक सांगत आहेत. त्यामुळे सकाळी आणि संध्याकाळीच जनावरांना बाहेर काढले जात असून दुपारच्या वेळेत त्यांना सावलीत ठेवले जात आहे.
शेतकरी जनावरांना भरपूर पाणी, हिरवा चारा आणि थंडावा मिळावा यासाठी विशेष काळजी घेत आहेत. काही ठिकाणी गोठ्यांच्या छतांवर गवताचे आच्छादन टाकून उष्णता कमी करण्याचाही प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यातील तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि उष्णतेपासून बचाव करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
