नागपूर. यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीला दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाने जुलै महिन्यात अचानक उघडीप दिल्याने विदर्भात अवर्षणाची चिन्हे दिसू लागली आहेत. 1 जून ते 9 जुलै या कालावधीत संपूर्ण विदर्भात सरासरीच्या तुलनेत 16 टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली असून, अनेक जिल्ह्यांमध्ये खरीप पिकांसाठी आवश्यक असलेला सततचा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

हवामान विभागाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. सुरुवातीचे काही दिवस आणि आठवड्याच्या शेवटी काही भागांत चांगला पाऊस झाला; मात्र त्यानंतर अनेक दिवस पावसाने दडी मारली. परिणामी जमिनीतील ओलावा कमी होऊ लागला असून पावसाची सरासरीही घसरली आहे.

जिल्हानिहाय आकडेवारी पाहता गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक 34 टक्के अधिक पाऊस झाला आहे. बुलढाणा आणि वर्धा जिल्ह्यांतही सरासरीपेक्षा किंचित अधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र, दुसरीकडे गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक 46 टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली असून ही स्थिती चिंताजनक मानली जात आहे.

याशिवाय भंडारा जिल्ह्यात 33 टक्के, वाशिममध्ये 26 टक्के, चंद्रपूरमध्ये 23 टक्के, अमरावतीमध्ये 12 टक्के, नागपूर आणि अकोला जिल्ह्यांत प्रत्येकी 10 टक्के, तर यवतमाळमध्ये 7 टक्के पावसाची तूट नोंदविण्यात आली आहे. या जिल्ह्यांतील अनेक भागांत पावसाअभावी पिकांची वाढ मंदावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नागपूर जिल्ह्यात 1 जून ते 9 जुलैदरम्यान 237.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीतील सरासरी 263.9 मिमी इतकी असल्याने जिल्ह्यात १० टक्के पावसाची तूट आहे. काही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या असल्या, तरी पिकांच्या उगवणीनंतर आवश्यक असलेला पाऊस न झाल्याने पिके तणावाखाली येण्याची भीती व्यक्त होत आहे.

कृषी तज्ज्ञांच्या मते, खरीप हंगामातील सुरुवातीच्या टप्प्यात पिकांना सातत्यपूर्ण पावसाची गरज असते. पावसात दीर्घ खंड पडल्यास सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि भात यांसारख्या पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. जमिनीतील ओलावा कमी झाल्यास दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

    हवामानातील सध्याची परिस्थिती कायम राहिली आणि पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर खरीप पिकांसमोर मोठे संकट उभे राहू शकते. त्यामुळे शेतकरी, कृषी विभाग आणि प्रशासनाचे लक्ष आता आगामी पावसाकडे लागले आहे .पुढील आठवडाभरातील पावसाची परिस्थिती खरीप हंगामासाठी निर्णायक ठरणार आहे.