जेएनएन, नागपूर/दिल्ली: राजधानी दिल्लीसह नागपूरमध्ये मोठा दहशतवादी कट उघडकीस आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) च्या नेत्यांना लक्ष्य करत संघाच्या कार्यालयांवर हल्ला करण्याची योजना आखण्यात आली होती. तपास यंत्रणांनी वेळेत कारवाई करत हा कट उधळल्याचा दावा केला आहे.
शहजाद भट्टीने रचला होता हल्ल्याचा कट
चौकशीदरम्यान अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवाद्यांकडून महत्त्वाची माहिती समोर आली. त्यात शहजाद भट्टी याने या हल्ल्याचा कट रचल्याचे उघड झाल्याची माहिती मिळाली आहे. नागपूरमधील संघ मुख्यालय आणि दिल्लीतील कार्यालय ही संभाव्य लक्ष्ये असल्याचेही तपासात समोर आले.
सुरक्षा यंत्रणा सतर्क
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, हल्ल्यासाठी आवश्यक स्फोटके आणि शस्त्रसाठा मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. यासाठी स्थानिक पातळीवर संपर्क जाळे तयार करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, संशयास्पद हालचालींची माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाले आहे. दरम्यान सुरक्षा यंत्रणाकडून कारवाई करत काही संशयितांना ताब्यात घेतले.
RSS कार्यालयांची सुरक्षा वाढवली
या पार्श्वभूमीवर नागपूर आणि दिल्लीतील RSS कार्यालयांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे.येणाऱ्या-जाणाऱ्यांवर कडक नजर ठेवली जात आहे.
संपूर्ण नेटवर्क उघड करण्याचे प्रयत्न सुरू
दरम्यान, अधिकृत पातळीवर सर्व तपशील जाहीर करण्यात आलेले नसले तरी, या घटनेमुळे देशातील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. तपास यंत्रणा या प्रकरणाचा अधिक खोलवर तपास करत असून, यामागील संपूर्ण नेटवर्क उघड करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
