जेएनएन, पुणे: शहरातील वारजे माळवाडी परिसरातील चैतन्य चौकात असलेल्या एका सलूनमध्ये भरदिवसा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील हल्ल्याची आठवण करून देणाऱ्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
माहितीनुसार, निहाल शिंदे आणि त्याचा एक मित्र हे केस कापण्यासाठी सलूनमध्ये आले होते. त्याचवेळी अचानक पाच जणांचा गट दुकानात घुसला आणि त्यांनी थेट गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात निहाल शिंदे यांच्या डाव्या कानाजवळून गोळी गेल्याने ते जखमी झाले. तसेच झालेल्या झटापटीत अमोल आढाव हा तरुणही जखमी झाला आहे.
गोळीबारानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून तात्काळ पळ काढला. स्थानिक नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच वारजे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलं असून इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे वारजे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून, नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. पोलिसांकडून परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
हेही वाचा: Pune News: पुण्यात PMPML बसचा ब्रेक पुन्हा फेल; वनाज चौकात अपघातात कामगार गंभीर
