जेएनएन, नागपूर: राज्य निवडणूक आयोगाद्वारे नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार, येत्या 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. मतदानाची संपूर्ण प्रक्रिया व्यवस्थित रित्या पार पडावी याकरिता निवडणूक प्रक्रियेत नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना रविवारी (ता.२८) मतदान प्रक्रियेचे प्रथम प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मनपा निवडणूक अधिकारी तथा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उपस्थितांना संपूर्ण मतदान प्रक्रियेची यथोचित माहिती दिली.
रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडलेल्या प्रशिक्षण वर्गात मनपा निवडणूक अधिकारी तथा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी मार्गदर्शन करताना संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य मानले जाते आणि ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी विविध शासकीय व निमशासकीय आस्थापनांतील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले की, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेशा मनुष्यबळाची नितांत आवश्यकता असून निवडणुकीसाठी निर्गमित आदेश नाकारणे, आपल्या कर्तव्यापासून पळ काढणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, वेळप्रसंगी फौजदारी कारवाई ही करण्याचा इशारा संबंधितांना मनपा आयुक्त यांनी दिला आहे.
मनपा निवडणूक अधिकारी तथा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी. यांच्यासोबत निवडणूक प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी मनपाच्या दहाही झोन मध्ये दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
या अधिकाऱ्यांमार्फत संबंधित झोनमध्ये विविध ठिकाणी निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले. प्रशिक्षण वर्गादरम्यान उपस्थितांना निवडणूकीतील महत्त्वाचे बदल, निवडणूक अनुषंगाने कायदेशीर तरतुदीसाठी महत्त्वाचे अधिनियम, भारतीय न्याय संहिता 2023 मधील तरतूद कलम 170, 171, 172, 174,175 मधील विशेष तरतूदी, भारतीय न्याय संहिता 2023 मधील निवडणूक अपराधांविषयी तरतुदी कलम 176, 177, 197,212 ,216,223, 3 व 4, 3 ते 5 मधील विशेष तरतूदी, निवडणूकीचे काम करणाऱ्या मतदारांसाठी टपाली मतदान प्रक्रिया, मतदान प्रक्रियेतील विविध टप्पे, निवडणूक साहित्य स्वीकृती व तपासणी, मतदानच्या आदल्या दिवशी पूर्वतयारी, महत्त्वाचे अहवाल व नमुने, ईव्हीएम मशीन नियंत्रण युनिट, मतपत्रिकेचे रंग, आदर्श मतदानकेंद्र रचना आदी विविध बाबींची सविस्तर माहिती देण्यात आली.
लक्ष्मीनगर झोन अंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश बगळे यांच्या मार्गदर्शनात सहा. निवडणूक निर्णय अधिकारी अखिलभारत मेश्राम, झोनचे सहायक आयुक्त धनंजय जाधव, व कार्यकारी अभियंता रविंद्र बुंधाडे यांच्यामार्फत प्रभाग क्र.16,36,37,38 या चार प्रभागांसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
धरमपेठ झोन अंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी इंदिरा चौधरी यांच्या मार्गदर्शनात सहा. निवडणूक निर्णय अधिकारी संतोष खांडरे, झोनचे सहायक आयुक्त राजकुमार मेश्राम, कार्यकारी अभियंता मनोज गद्रे यांच्या मार्फत प्रभाग क्र.12,13,14,15 या चार प्रभागांसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हनुमान नगर झोन अंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी प्रदिप शेलार यांच्या मार्गदर्शनात सहा. निवडणूक निर्णय अधिकारी रोहिणी पाठराबे, झोनचे सहायक आयुक्त नरेंद्र बावनकर, कार्यकारी अभियंता विजय गुरुबक्षानी यांच्या मार्फत प्रभाग क्र.29,31,32,34 या चार प्रभागांसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
धंतोली झोन अंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी श्री. प्रियेश महाजन यांच्या मार्गदर्शनात सहा. निवडणूक निर्णय अधिकारी कौशल्याराणी पाटील, झोनचे सहायक आयुक्त प्रमोद वानखेडे, कार्यकारी अभियंता अनिल गेडाम यांच्या मार्फत प्रभाग क्र. १७,३३,३५ या तीन प्रभागांसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
नेहरूनगर झोन अंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी अमोल कुंभार यांच्या मार्गदर्शनात सहा. निवडणूक निर्णय अधिकारी सतिश साळवे, झोनचे सहायक आयुक्त विकास रायबोले, कार्यकारी अभियंता कमलेश चव्हाण यांच्या मार्फत प्रभाग क्र. २६,२७,२८,३० या चार प्रभागांसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
गांधी महाल झोन अंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी श्रीराम मुदंडा यांच्या मार्गदर्शनात सहा. निवडणूक निर्णय अधिकारी वैभव पवार, झोनचे सहायक आयुक्त घनश्याम पंधरे, कार्यकारी अभियंता गिरीश लिखार यांच्या मार्फत प्रभाग क्र. ८,१८,१९,२२ या चार प्रभागांसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
सतरंजीपुरा झोन अंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी संपत खलाटे यांच्या मार्गदर्शनात सहा. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती शितल घावटे झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत, कार्यकारी अभियंता श्रीमती अश्विनी यांच्या मार्फत प्रभाग क्र. ५,२०,२१ या तीन प्रभागांसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
लकडगंज झोन अंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी मलिक विराणी यांच्या मार्गदर्शनात सहा. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती प्राजक्ता बुरांडे, झोनचे सहायक आयुक्त विजय थूल, कार्यकारी अभियंता सचिन रक्षमवार यांच्या मार्फत प्रभाग क्र. ४, २३,२४,२५ या चार प्रभागांसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
आशीनगर झोन अंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनात सहा. निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती विनिता लांजेवार, उपायुक्त व झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, कार्यकारी अभियंता निलेश बोबडे यांच्या मार्फत प्रभाग क्र. २,३,६,७ या चार प्रभागांसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
मंगळवारी झोन अंतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी विवेक साळुंके, यांच्या मार्गदर्शनात सहा. निवडणूक निर्णय अधिकारी गणेश दिघे, उपायुक्त व झोनचे सहायक आयुक्त अशोक गराटे, कार्यकारी अभियंता नरेश शिंगणजोडे यांच्या मार्फत प्रभाग क्र. १, ९, १०,११ या चार नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
हेही वाचा: मुंबईत राष्ट्रवादीची उमेदवार यादी वादात; कुख्यात गुन्हेगार सज्जू मलिकला उमेदवारी, विरोधकांचा तीव्र आक्षेप
