नागपूर. Nagpur Winter Session 2025 : राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू होत असून यात 18 विधेयके मांडली जाणार आहेत. मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यास शासन तयार आहे. राज्यात सद्यस्थितीत राबविण्यात येत असलेल्या लोककल्याणकारी योजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही,अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था देशातील मोठ्या राज्यांमध्ये सर्व निकषांत अग्रेसर असणारी अर्थव्यवस्था आहे. राज्यात पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या सुमारे 92 टक्के म्हणजेच 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली आहे. केवायसी (KYC) प्रक्रियेमुळे राहिलेल्या उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच मदत देण्यात येईल. अतिरिक्त 10 हजार रुपयांची मदत तसेच खरडून गेलेल्या जमिनी, विहिरी आदींसाठी स्वतंत्र मदत दिल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
शनिवार व रविवार सुटीच्या दिवशीही कामकाज करण्यात येणार आहे. नागपूर अधिवेशनात दररोज 10 तासांहून अधिक कामकाज करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. या अधिवेशनात 18 विधेयके मांडली जाणार असून विदर्भ आणि मराठवाड्याशी संबंधित अधिकाधिक प्रश्नांवर चर्चा होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. दावोससह विविध मंचांवर झालेले गुंतवणूक करार मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्षात येत असून हे उद्योग महाराष्ट्रात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
हे ही वाचा - Maharashtra Winter Session: हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीचा मोठा निर्णय
नागरिकांचे प्रश्न सोडवणे हाच शासनाचा अजेंडा!
शासनाने लोकाभिमुख आणि कल्याणकारी निर्णय घेतले आहेत. अधिवेशनात विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रश्नांवर प्राधान्याने चर्चा करण्यात येणार असून नागरिकांचे प्रश्न सोडवणे हाच शासनाचा अजेंडा असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विदर्भ तसेच मराठवाड्यातील शेती, सिंचन, आरोग्य, रोजगार निर्मिती यासह सर्वच महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येईल. विदर्भात अधिवेशन होत असल्याने येथील प्रश्नांवर चर्चा करून न्याय देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. जीडीपी, स्टार्टअप, विदेशी गुंतवणूक आदींमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे सांगून देशात सर्वात जास्त पायाभूत सुविधांचे प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्टपूर्तीमध्ये महाराष्ट्र कुठेही कमी पडणार नाही, असेही शिंदे यांनी सांगितले.
