जेएनएन, नागपूर: मध्य नागपुरात असणाऱ्या सर्वात जुन्या एम्प्रेस मिल परिसरातील मारवाडी चाळला लागून असलेली ऐतिहासिक शिकस्त भिंत रविवारी (ता.7 सप्टेंबर) रात्री 11.30 वाजताच्या सुमारास अचानक कोसळली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र भिंतीच्या मलब्याखाली 4 चारचाकी वाहने दाबल्या गेल्याने वाहन क्षतिग्रस्त झाले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी (ता. 8 सप्टेंबर) सकाळी यांनी घटनास्थळाची पाहणी करून विद्यमान मालकाला नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.
सन 1889 मध्ये टाटा समूहाने स्थापन केलेल्या एम्प्रेस मिलचा हा परिसर आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास अचानक या परिसरातील मारवाडी चाळला लागून असलेली भिंत कोसळली, कोसळलेली भिंत जवळपास 136 वर्षे जुनी असल्याचे सांगितल्या जाते. सहा मीटर उंच आणि पन्नास फूट लांबीची ही भिंत चुना व विटांनी बांधण्यात आली होती. या भिंतीच्या शेजारील नाल्यावर टाकलेल्या स्लॅबवर चारचाकी वाहने पार्क करण्यात आली होती. भिंत कोसळल्याने या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भिंतीसह नाल्यावरची स्लॅबही कोसळला, सुदैवाने त्यावेळी वाहनांमध्ये कोणीही नव्हते.
मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी धोकादायक स्लॅबचे काम त्वरित करण्याचे आणि जुनी भिंत पडण्याचे निर्देश संबधित विभागाला दिले. त्यांच्या सूचनांनुसार, मनपाच्या गांधीबाग झोनच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने परिसरातील शिकस्त भिंत पाडली. या वेळी उपअभियंता संजय इंगळे, कनिष्ठ अभियंता बी. के. तायडे आणि दिलीप वंजारी उपस्थित होते.
...अन् ते बचावले
या भिंत कोसळण्याचा एक सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. त्यानुसार, दोन दुचाकी वाहने त्या रस्त्याने जाताना दिसतात. पहिली दुचाकी सुखरूप पुढे गेली, तर दुसरी दुचाकी निघत असतानाच आकस्मिकरित्या भिंत कोसळल्याचे चित्र स्पष्ट दिसते. विशेष म्हणजे, दोन्ही वाहनचालक आणि त्यांच्यासोबत मागे बसलेले प्रवासी यांची थरकाप उडवणारी ही घटना थोडक्यात टळली आणि सर्वजण सुखरूप बचावले आहेत.
हेही वाचा: Nashik Accident News: नाशकात भीषण अपघात, बस आणि मोटारसायकलच्या धडकेत तिघांचा मृत्यू