जेएनएन,नागपूर. Nagpur Metro: पदव्युत्तर (पोस्ट ग्रेजुएट) विद्यार्थ्यांना महा कार्ड आता पूर्णपणे मोफत मिळवू शकता. होय, अगदी मोफत.नागपूर मेट्रोने आपल्या प्रवाशांना सुलभ आणि किफायतशीर प्रवासासाठी नेहमीच नव-नवीन उपाययोजना केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून महा मेट्रोच्या वतीने महा कार्डसाठी लागू असणाऱ्या शुल्कावर 100% सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.केवळ रु.200 चा टॉप-अप करून आपण हे महा कार्ड मोफत मिळवू शकता.

या उपक्रमाची अंबलबजावणी आज दिनांक 5 सप्टेंबर 2025 पासून करण्यात आली असून हे कार्ड पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. हे महा कार्ड स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या सहकार्याने जारी करण्यात आले असून, प्रवासाच्या मेट्रो भाड्यावर 10% सवलत दिली जाते.

महा कार्ड सेवा सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत 1,20,364 पेक्षा अधिक महा कार्ड्सची विक्री करण्यात आली आहे.

महा कार्डच्या वापरामुळे प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी रांगेत थांबण्याची गरज राहत नाही, फक्त AFC गेटवर टॅप करून प्रवेश व निर्गमन करता येतो. तसेच, या पद्धतीत प्रत्यक्ष तिकीटची आवश्यकता नसते, त्यामुळे कागदाची बचत होऊन पर्यावरण रक्षणातही हातभार लागतो.

महा कार्डचा सहज आणि सोपा वापर हीच त्याची लोकप्रियता असल्याचे कारण आहे. यामुळे नागपूरकरांसाठी मेट्रो प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि विद्यार्थ्यांसाठी अनुकूल बनतो.महा मेट्रो नागपूरकरांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करत असून रु.200 च्या टॉप-अपवर मोफत महा कार्ड मिळवा. तपशीलांसाठी आणि कार्ड मिळवण्यासाठी आपल्या जवळच्या मेट्रो स्थानकाला भेट द्या.