जेएनएन,नागपूर: नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या प्रशासकीय तयारीला आता वेग आला असून, याअनुषंगाने निवडणुकीसाठी अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्ट्राँग रूमची प्रत्यक्ष पाहणी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केली. मनपाद्वारे बचत भवन नॉर्मल स्कूल वसाहत परिसर, सीताबर्डी येथे केंद्रीय स्ट्राँग रूम उभारण्यात आले आहे. विशेष म्हणजे,राज्य निवडणूक आयोगाद्वारे प्राप्त होणाऱ्या ईव्हीएम मशीन या ठिकाणाहून झोन निहाय केंद्रावर पाठवले जाणार आहेत.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी., मुख्य अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त मिलिंद मेश्राम, उपायुक्त मंगेश खवले, कार्यकारी अभियंता मनोज गद्रे, कार्यकारी अभियंता राजेंद्र राठोड कार्यकारी अभियंता संजय माटे, नवघरे माहिती व तंत्रज्ञान अधिकारी  स्वप्नील लोखंडे, राज चौधरी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

मनपा सार्वत्रिक निवडणूक 2025-26 साठी येत्या 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. तसेच 16 जानेवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि निर्दोष पार पाडण्याच्या उद्देशाने आयुक्तांनी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेची बारकाईने तपासणी केली. स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम मशीनची सुरक्षा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे, विद्युत पुरवठा आणि आगीपासून संरक्षणासाठीची यंत्रणा यावर आयुक्तांनी विशेष लक्ष दिले.

हेही वाचा: PMC Elections: ठाकरे बंधूंनंतर, काका-पुतण्या देखील एकत्र येऊन युतीने निवडणूक लढवण्यास तयार