जेएनएन, नागपूर: राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर तातडीने विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर (Vijay Wadettiwar) यांनी केली आहे. याबाबत वडेट्टीवार यांनी राज्याचे राज्यपाल यांना पत्र लिहिले आहे.
वडेट्टीवार यांनी पत्राद्वारे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांसह राज्याच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर आपत्कालीन परिस्थितीकडे राज्यपालांचे लक्ष वेधले आहे. राज्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिक संकटात सापडले असून त्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे.
उभी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त
राज्यात तब्बल 4 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील उभी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. अनेक ठिकाणी शेतजमिनी खरवडून गेल्याने शेतकऱ्यांचे श्रम मातीमोल झाले आहेत. पूरपरिस्थितीत अनेक जनावरे वाहून गेली, घरे कोसळली आणि दुर्दैवाने जीवितहानी देखील झाली आहे.
विजेचे खांब व तारा कोसळल्याने अनेक ठिकाणी वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे. गाव आणि शहरांना जोडणारे महत्त्वाचे रस्ते खचल्याने दळणवळण व्यवस्था पूर्णपणे खंडित झाली आहे. पिण्याचे पाणी दूषित झाल्याने सार्वजनिक आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, ही माहिती वडेट्टीवार यांनी पत्रात नमूद केली आहे.
अतिवृष्टी, पूरस्थिती, उद्ध्वस्त पिके, वाहून गेलेली जनावरे, कोसळलेली घरे आणि विस्कळीत वीजपुरवठा या गंभीर परिस्थितीत जनतेला तात्काळ दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन घेण्यात यावे यासाठी राज्यपालांना पत्र लिहिले.
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 29, 2025
राज्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा, शेतकऱ्यांची… pic.twitter.com/5gH534hRne
'ओला दुष्काळ' जाहीर करून…
या गंभीर संकटातून राज्याला बाहेर काढण्यासाठी तातडीने धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. राज्यात तातडीने 'ओला दुष्काळ' जाहीर करून बाधित शेतकरी आणि सामान्य नागरिकांसाठी सरसकट, आर्थिक मदत आणि पुनर्वसन पॅकेज जाहीर करावे.शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याच्या आश्वासनाची पूर्तता करावी. तसेच, पिके आणि मालमत्तेचे योग्य मूल्यमापन करून तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
जनतेला दिलासा…
तातडीच्या या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यासाठी, तसेच जनतेला दिलासा देणारे ठोस धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी, महाराष्ट्र विधानसभेचे विशेष अधिवेशन त्वरित बोलावण्याचा आग्रह करावा, अशी विनंती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यपालांना केले आहे.