जेएनएन, नागपूर: लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) ही सरकारची लोकाभिमुख आणि जनकल्याणकारी योजना असून ती कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही. योजना सुरू करताना आम्ही सकारात्मक भावनेने निर्णय घेतला, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. 

विधानसभा सदस्य सुनील प्रभू, जयंत पाटील, नानाभाऊ पटोले, हारून शेख यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एका लक्षवेधी सुचनेद्वारे विचारणा केली असता, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिले. 

लाडकी बहिण योजनेसाठी आगाऊ निधीही उपलब्ध करून दिला

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, आचारसंहितेच्या काळातही लाभार्थींना अडथळा येऊ नये म्हणून आगाऊ निधीही उपलब्ध करून देण्यात आले होते. लाभार्थी बहिणींनी सरकारच्या कामावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात जनादेश दिला आहे. त्यामुळे ही योजना कमी करणे किंवा बंद करणे तर दूरच, आम्ही ज्या-ज्या घोषणा केल्या आहेत त्या योग्य वेळी पूर्ण केल्या जातील. 

लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी मोठा आधार

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, लाडकी बहीण योजना ही राज्यातील लाखो महिलांसाठी मोठा आधार असून तिचा विस्तार आणि लाभ सातत्याने सुरु राहील. शासन दिलेल्या सर्व वचनांची पूर्तता करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

    लाडकी बहीण योजनेचा हफ्ता 2100 रुपये करण्याचा निर्णय कधी?

    विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की लाडकी बहीण योजनेतील मानधन 1500 वरून 2100 रुपये करण्याचा निर्णय योग्य वेळी शासकीय नियमानुसार घेतला जाईल.