जेएनएन, नागपूर. Nagpur Latest News: नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयापासून दीड किलोमीटर अंतरावर कोठीरोड, महाल परिसरात रविवारी रात्री साडेअकरा ते बारा दरम्यान गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. तीन दुचाकीवर सहा जण आले आणि या टोळक्याने दोनदा फायरिंग केली आहे.

दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर गोळीबार 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय परिसरातील महाल परिसरातल्या कोठी रोड भागात उशिरा रात्री दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर गोळीबार झाला. शहर शांततेत झोपलेले असताना अचानक गोळीबाराचा आवाज घुमल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

दोन गटांमध्ये वर्चस्वाच्या वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री बारा वाजताच्या सुमारास तीन दुचाकींवरून सहा जण कोठी रोड परिसरात आले. त्यांनी दोन राऊंड गोळीबार करत परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. 

तक्रार दाखल

या प्रकरणात सौरभ यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार रवि मोहतो आणि गंगा काकडे यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप केला आहे.  

    घटना कशी घडली? 

    मध्यरात्री तीन दुचाकींवरून सहा जण आले. आणि त्यांनी परिसराची चाचपणी केली. परिसरात कोणीही दिसत नसल्याचे पाहून त्यांनी दबा धरून कोठीरोड भागात दोनदा गोळीबार केला.

    पुढील तपास सुरु

    पोलिसांच्या मते, ही फायरिंग वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि दहशत पसरवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. आरोपींमध्ये अंतर्गत वाद असल्याचेही समजते. पोलिसांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली असून पुढील तपास सुरु केला आहे.