जेएनएन, नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या स्थापनेला 75 वर्ष पूर्ण होत असून, मनपाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने मनपा आरोग्य विभागातर्फे एचसीजी कॅन्सर हॉस्पिटल आणि रोटरी क्लब नागपूर नॉर्थच्या सहकार्याने येत्या 1 नोव्हेंबर 2025 पासून महिलांकरिता निःशुल्क स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या पुढाकाराने व अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहेत.

30 वर्षावरील महिलांकरिता हे विशेष स्तन कर्करोग तपासणी शिबिर असून, 13 नोव्हेंबर 2025 पर्यंत झोननिहाय नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये हे शिबिर घेण्यात येतील. 1 नोव्हेंबरला लकडगंज झोन अंतर्गत हिवरी नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या शिबिराचा शुभारंभ होईल. सदर शिबिरामध्ये एचसीजी कॅन्सर हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांच्या चमूद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. शिबिराकरिता आवश्यक सहकार्य रोटरी क्लबद्वारे करण्यात येणार आहे.
मनपा झोनल वैद्यकीय अधिकारी, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत कार्यरत वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका यांच्यामार्फत शिबिराच्या आयोजनासाठी सहकार्य करण्यात येत आहे. शहरातील 30 वर्षापेक्षा वरील वयोगटातील महिलांनी या निःशुल्क शिबिरामध्ये उपस्थित राहून तपासणी करावी, असे आवाहन मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांनी केले आहे.
हेही वाचा: Nagpur News: राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय- नागपूरच्या विकासासाठी 315 कोटीचा विकास निधी मंजूर
