जेएनएन, नागपूर: शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने नागपूर महानगरपालिकेसाठी तब्बल 315 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, स्वच्छता, उद्याने आणि प्रकाश व्यवस्थेच्या विकासकामांना वेग येणार आहे. मनपाच्या हेल्दी स्ट्रीट प्रकल्प अंतर्गत धरमपेठ व शंकरनगर भागातील मुख्य रस्त्यांची पादचारी मार्ग सुधारणा करण्यासाठी रू. 20 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पोलीस लाईन टाकळी, बिनाकी मंगळवारी व नाईक तलावाचे सौंदर्यीकरण्यासाठी भरीव निधीचे प्रावधान करण्यात आले आहे.
नगरविकास विभागाच्या 29 ऑक्टोबर 2025 च्या शासन आदेशानुसार या निधीची तरतूद मनपा क्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व सुविधा उभारणीसाठी करण्यात आली आहे. राज्य शासनातर्फे दोन आदेश काढण्यात आले आहे.एका आदेशात रू.175 कोटी तर दुसऱ्या आदेशात रू.140 कोटी निधीच्या विकास कामांना मान्यता दिली आहे.
महानगरपालिकेने काही महिन्यांपूर्वी शहराच्या गरजांचा सविस्तर विकास आराखडा शासनाकडे पाठविला होता. त्याला मंजुरी देत राज्य सरकारने निधी वाटपाचा निर्णय घेतला आहे. शहराचा विस्तार झपाट्याने वाढत असल्याने पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी हा निधी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यानुसार, मंजूर निधीतून प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांचे काँक्रीटीकरण व डांबरीकरण, जुन्या पाणीपुरवठा पाइपलाइनचे बदल, नव्या ड्रेनेज लाईन्स टाकणे, तसेच उद्याने आणि खेळाची मैदाने विकसित करणे यासारखी महत्त्वाची कामे हाती घेण्यात येतील. याशिवाय स्मार्ट लाइटिंग प्रकल्प, स्वच्छता केंद्रे, सार्वजनिक शौचालये, आणि कचरा व्यवस्थापन यंत्रणा सुधारणा या प्रकल्पांनाही निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
विशेषतः पूर्व आणि उत्तर नागपूरसह इतर भागातील जलनिस्सारण आणि पाणीपुरवठा समस्या प्राधान्याने सोडविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पश्चिम नागपूरमधील वाहतुकीतील अडचणी दूर करण्यासाठी काही प्रमुख चौकांचे पुनर्रचना आराखडेही तयार केले गेले आहेत.
राज्य सरकारने नागपुराला विकसित करण्यासाठी घेतलेल्या उपक्रमांशी हा निर्णय सुसंगत असून भविष्यातील अधोसंरचना क्षमता बळकट करण्यास मदत होईल. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नागपूरच्या नागरी विकास आराखड्याला गती मिळून प्रलंबित आणि अत्यावश्यक नागरी सुविधा प्रकल्पांना नवसंजीवनी मिळणार आहे. येत्या काही महिन्यांत रस्ते, पाणीपुरवठा आणि सार्वजनिक सोयी-सुविधांमध्ये ठोस सुधारणा दिसून येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
असे आहेत महत्त्वाचे निवडक प्रकल्प...
- हेल्दी स्ट्रीट प्रकल्प अंतर्गत धरमपेठ व शंकरनगर भागातील मुख्य रस्त्यांची पादचारी मार्ग सुधारणा करणे.
- पोलीस लाईन टाकळी, बिनाकी मंगळवारी व नाईक तलावाचे सौंदर्यीकरण.
- महात्मा फुले उद्यान सुयोग नगर येथे रॉक गार्डन.
- पूर्व नागपूर मतदार संघात विविध ठिकाणी मनपाच्या खुल्या जागेत पाथवे, संरक्षण भिंत व विविध विकास कामे.
- दक्षिण-पश्चिम व पश्चिम मतदार संघात सुशोभीकरण व विकास कार्य करणे.
- इमामवाडा रोड जवळील नाल्याची सुरक्षा भिंतीचे बांधकाम काम.
- मौजा हुडकेश्वर व नरसाळा येथील विविध ठिकाणच्या खेळांच्या मैदानाचे व उद्यानाचे सौंदर्यीकरण.
- दक्षिण-पश्चिम मतदार संघातील ब वर्ग तीर्थक्षेत्र रेणुका माता मंदिर संस्थान परिसर विकास कामे करणे.
- नागपूर व्यायाम शाळा महालच्या सभागृहाचे बांधकाम व इतर कामे.
- कोर्पोरेशन कॉलनी, जागनाथ बुधवारी व,लेंडी तलाव बारीपुरा चौक मातंगपुरा सह इतर विविध ठिकाणी ई- वाचनालयाचे बांधकाम करणे.
- ठक्करग्राम पाचपावली परिसरात सफाई कामगारांच्या वस्तीत समाज भवन बनवणे.
हेही वाचा: मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली कर्जमाफीची तारीख... पुढील वर्षी शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी
