जेएनएन, नागपूर: नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुक 2025 साठी विवाहित महिला उमेदवारांनी विवाहापूर्वीचे किंवा विवाहानंतरच्या नावांपैकी कोणते नाव उमेदवारी अर्जावर नमूद करावे, याबद्दल राज्य निवडणूक आयोगाने निर्देश दिले आहेत.
यासंदर्भात लोकांमध्ये संभ्रम असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक महिला उमेदवाराचे नाव संबंधित मतदार यादीमध्ये असणे आवश्यक आहे. त्यामुळे नामनिर्देशनपत्र दाखल करताना विवाहित उमेदवारांना मतदार यादीमध्ये असलेल्या नावानेच उमेदवारी अर्ज दाखल करावा लागणार आहे.
निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या विवाहित महिला उमेदवारास मतदार यादीमध्ये व नामनिर्देशन पत्रामध्ये नमूद असलेल्या नावाखेरीज मतपत्रिकेवर इतर नावाचा उल्लेख करावयाचा असल्यास उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी तसा विनंती अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे सादर करावा लागेल.
आवश्यक पुरावे सादर करणे अनिवार्य
ज्या नावाचा उल्लेख मतपत्रिकेवर करावयाचा आहे. त्याच्या पुष्ठर्थ आवश्यक पुरावे (विवाह नोंदणी प्रमाणपत्र, राजपत्रात प्रसिद्ध केलेले विवाहानंतरचे नाव) सादर करणे अनिवार्य आहे. विवाहित महिला उमेदवारांकडे वरील प्रमाणपत्र तसेच राजपत्र उपलब्ध नसल्यास मतदाराने मतदान करण्यापूर्वी आपली ओळख पटविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे 8 नोव्हेंबर 2011 रोजीच्या आदेशात नमूद केलेल्या 17 पुराव्यांपैकी छायाचित्र असलेला कोणताही एक पुरावा सादर करणे आवश्यक राहिल.
विवाहित महिलांना विवाहापूर्वी व विवाहानंतरचे दोन्ही नावे मतपत्रिकेवर जोडून छापण्याची विनंती केल्यास अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करताना मतदार यादीतील नावापुढे विवाहानंतरचे किंवा पूर्वीचे नाव देखील कंसात छापण्याची परवानगी दिली जाईल. ईव्हीएममध्ये नाव मुद्रीत करण्यासाठी असलेल्या जागेचाच व विहित फॉँटचा वापर होईल, असेही राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा:BMC Election 2026: महाविकास आघाडी बिघाडी! मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार
