नागपूर, पीटीआय: Devendra Fadnavis On USA Tariff: "जर आपण उद्योगांना अखंड प्रशासकीय पाठिंबा दिला, तर आंतरराष्ट्रीय आर्थिक आव्हानांना तोंड देता येईल," असे म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमेरिकेने लादलेल्या 25 टक्के टॅरिफसह जागतिक व्यापार अडथळ्यांवर मात करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

अमेरिकेने शुक्रवारी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावला आहे, ज्यामुळे अमेरिकेला होणाऱ्या 86 अब्ज डॉलर्सच्या भारतीय निर्यातीपैकी निम्म्या निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

नागपूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये (IIM) दोन दिवसीय प्रशासकीय परिषदेत बोलताना फडणवीस शनिवारी म्हणाले, "जर आपण आपल्या उद्योगांना अखंड प्रशासकीय पाठिंबा दिला, तर आपण कोणत्याही आंतरराष्ट्रीय आर्थिक आव्हानावर मात करू शकतो."

ते म्हणाले की, राज्य सरकार लवकरच नागरिकांना कार्यक्षम आणि प्रतिसाद देणारे प्रशासन प्रदान करण्याच्या उद्देशाने महत्त्वाच्या सुधारणा लागू करणार आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या विस्तृत चर्चेनंतर विभागीय आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या सहा समित्यांनी सुधारणा-केंद्रित शिफारशी सादर केल्या आहेत, असे ते म्हणाले.

"या समित्यांनी प्रशासकीय यंत्रणेत आवश्यक असलेले बदल ओळखले आहेत. तपशीलवार विश्लेषण आणि मसुदा सरकारी ठरावांसह असलेल्या या शिफारशी सार्वजनिक सेवांच्या वितरणात वाढ करण्यासाठी तात्काळ लागू केल्या जातील," असे ते म्हणाले.

    फडणवीस यांनी असेही आश्वासन दिले की, अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांची भरती 150 दिवसांत पूर्ण केली जाईल आणि असे कोणतेही पद रिक्त राहणार नाही.

    त्यांनी जिल्हा वार्षिक नियोजन प्रणालीत सुधारणा करण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले. ही केवळ एक रोजगार योजना न राहता, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती आणि विकासाचे एक साधन बनले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

    "जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या अखत्यारीतील स्थानिक विकास कामांसाठी एकूण योजना निधीच्या पाच टक्क्यांपर्यंत निधी वाटप करण्याचे अधिकार देण्याची शिफारस करण्यात आली आहे," असे ते म्हणाले.