जेएनएन, नागपूर: अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता आदि आवश्यक सुविधा विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक ती रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केलेली आहे. सदर योजनेसाठी सन 2024-25 मधील अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली  असून आता विद्यार्थ्यांना दिनांक 31 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्यात येणार आहे.

अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी वसतीगृह प्रवेशासाठी ऑनलाइन पोर्टल द्वारे दिलेल्या मुदतीत ऑनलाईन अर्ज सादर केलेले आहे आणि या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांना वस्तीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन प्रणालीद्वारे आपोआप स्वाधार योजनेसाठी वर्ग होणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही.

विद्यार्थ्यांचे उशिरा सुरू होणारे शैक्षणिक सत्र, सद्यस्थितीत स्वाधार योजनेचा लाभ घेत असलेले विद्यार्थी तसेच नव्याने स्वाधार योजनेसाठी अर्ज करणारे विद्यार्थी यांना ऑनलाईन अर्ज करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. काही विद्यार्थी संघटना आणि क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी यांनी मुदतवाढ देणे बाबत मागणी केली आहे. या बाबी विचारात घेता अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 16 डिसेंबर 2024 पर्यंत वाढविण्यात आलेली होती. परंतु अद्यापही बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केलेले दिसून येत नाही त्यामुळे पुन्हा काही विद्यार्थी संघटना आणि क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी यांनी मुदतवाढ देणे बाबत मागणी केली आहे. या बाबी विचारात घेता अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 31 डिसेंबर 2024 पर्यंत वाढविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे संपर्क साधावा व पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करुन या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.