जेएनएन, मुंबई: महाराष्ट्र्र वर्धा जिल्ह्यतील हिंगणघाट येथे जन्मलेले मुरलीधर देवीदास आमटे ऊर्फ बाबा आमटे यांचा जन्म 6 डिसेंबर 1914 रोजी झाला. व्यवसायाने वकील असलेल्या बाबा आमटे यांनी समाजसेवेचा वसा घेतला होता. त्यांच्या या कार्यात त्यांना शेवटपर्यंत साथ लाभली ती म्हणजे त्यांच्या पत्नी साधनाताई आमटे यांची. बाबा आमटे यांना समाजसेवेचे हे वेड इतके होते की, घरी असलेले सगळ्या सुख सुविधांचा त्याग करत त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन येथे लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली व आजीवन येथे राहून कृष्ठरोग्यांची सेवा केली. जवाहरलाल नेहरूंच्या शिफारसीमुळे त्यांनी 1949-50 या काळात फक्त डॉक्टरांना करता येणारा कुष्ठरोगनिदानावरील आणि चिकित्सेवरील अभ्यासक्रम पूर्ण केला. व सुरुवात झाली कृष्ठरोग्यांच्या सेवेला.
कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी आनंदवनाची स्थापना
मायकोबॅक्टेरियम लेप्री नावाच्या जिवाणूमुळे होणार हा रोग एखाद्या व्यक्तीचे जीवन उद्धवस्त करू शकतो. हा एक संसर्गजन्य आजार असून, या आजारामुळे त्वचा, श्वसनसंस्था, डोळे आणि मज्जातंतूंवर विपरीत परिणाम होतो. आताच्या आधुनिक काळात कृष्ठरोगावर औषधोपचार, लस उपलब्ध असली तरीही काही 40-50 वर्षांआधी कृष्ठरोगाबाबत तितकी जनजागृती नव्हती तसेच, औषधोपचार देखील नव्हते. रुग्णाच्या सतत संपर्कामुळे हा आजार होण्याचा देखील धोका वाढतो. कृष्ठरोगायांच्या सेवेसाठी बाबा आमटेंनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे 1948 साली दोन झोपड्यांमधून कृष्ठरोग्यांची सेवा करायला सुरुवात केली. घनदाट जंगल आणि प्राण्यांचे अधिवास असलेल्या ठिकाणी त्यांनी आनंदवनाची स्थापना केली. व्यवसायाने वकील असलेले मुरलीधर देविदास आमटे म्हणजेच बाबा आमटे यांना त्यांच्या पत्नी साधनाताई आमटे यांनी देखील साथ देत. त्याच्या या अमूल्य कार्यात सिंहाचा वाटा उचलला. अनेक संकटांचा सामना करीत बाबा आमटे व साधनाताई आमटे यांनी हे नंदनवन उभे केले. शारीरिक व्याधीने त्रस्त असलेले व ज्यांना समाजाने वाळीत टाकले अश्या सर्वांना या दाम्पत्याने जवळ केले. कधी काळी केवळ दोन झोपड्यांपासून सुरु झालेला हा महारोगी सेवा समिती प्रकल्प आज 5 हजार लोकांच्या गावामध्ये रूपांतरित झाला आहे.
1948 साली सुरु झालेल्या या आंनदवनात अंध, अपंग, मूकबधिर, आदिवासी नागरिकांची सेवा आंदवनात बाबा आमटेंनी केली आणि आजही केली जात आहे. या प्रकल्पात या नागरिकांच्या हाताला काम मिळावे ते आत्मनिर्भर व्हावे यासाठी अनेक उद्योग देखील चालवले जातात. येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या मदतीने शेती पिकवली जाते. शेतीत येणार भाजीपाला विकून अर्थसहाय्य उभे केले जाते. तसेच हातमाग, यंत्रमाग, हस्तकला, शिवणकला, ग्रिटिंग कार्ड विभाग, प्रिंटीग प्रेस असे विविध उद्योग येथे चालवले जातात. तसेच रुग्णालये,शाळा व महाविद्यालय, अंध व मूकबधिर मुलांची शाळा, अनाथालय इत्यादी देखील सुरु केले आहेत.

संपूर्ण जीवन नागरिकांच्या सेवेसाठी कार्य करणारे बाबा आमटे यांचे 9 फेब्रुवारी 2008 रोजी वरोरा येथील निवासस्थानी रक्ताच्या कर्करोगाने त्यांचे निधन झाले. बाबा आमटे यांच्या कार्याचा हा वसा त्यांच्या पुढच्या पिढ्याही डॉ. प्रकाश आमटे, विकास आमटे व त्यांचे कुटुंबीय विविध प्रकल्पांच्या माध्यमातून तेवढ्याच निष्ठेने पूर्ण करत आहेत.