जेएनएन, नागपूर. शहरातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असल्या, तरी अपघाती मृत्यूंचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. यंदा जानेवारी ते ऑक्टोबर या दहा महिन्यांच्या कालावधीत नागपूर शहरात झालेल्या विविध रस्ते अपघातांमध्ये तब्बल 224 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील वर्षी याच कालावधीत 253 जणांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे यंदा मृत्यूंच्या संख्येत सुमारे 11 टक्क्यांची घट नोंदविण्यात आली असली, तरी अपघातांची परिस्थिती अद्याप चिंताजनक असल्याचे चित्र आहे.

रस्ता सुरक्षा समितीच्या आढाव्यातून शहरातील अपघातांबाबत अनेक महत्त्वपूर्ण बाबी समोर आल्या आहेत. त्यानुसार, रात्री 9 ते 12 हा तीन तासांचा कालावधी अपघातांच्या दृष्टीने सर्वाधिक धोकादायक ठरत आहे. रात्रीच्या वेळी वाहनांचा वेग वाढणे, वाहतुकीवरील नियंत्रण कमी होणे आणि वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे गंभीर अपघातांची शक्यता वाढत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. विशेषतः या वेळेत होणाऱ्या अपघातांमध्ये जीवितहानी टाळण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.

14 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत मृत्यू वाढले

एकीकडे शहरातील एकूण अपघाती मृत्यूंच्या संख्येत घट झाली असली, तरी शहरातील 14 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अपघाती मृत्यूंची संख्या वाढल्याचे आढळले आहे. त्यामुळे शहरभर एकसमान उपाययोजना करण्याऐवजी ज्या भागांमध्ये अपघात आणि मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे, त्या परिसरांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे.

दहा अति अपघातप्रवण मार्गांपैकी सात मार्गांवर मृत्यू वाढले

नागपूर शहरातील दहा अति अपघातप्रवण मार्गांचा आढावा घेतला असता, त्यापैकी सात मार्गांवर अपघाती मृत्यूंच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हे मार्ग वाहनचालकांसाठी अधिक धोकादायक ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मार्गांवर वेगमर्यादेचे पालन, वाहतूक नियमांची अंमलबजावणी, आवश्यक ठिकाणी वाहतूक नियंत्रण आणि अपघात रोखण्यासाठीच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.

    अतिवेग ठरतोय अपघाती मृत्यूंचे प्रमुख कारण

    रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीतील आढाव्यानुसार, अतिवेग हे अपघाती मृत्यूंचे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट झाले आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यामुळे वाहनचालकांचे नियंत्रण सुटणे आणि अपघात घडल्यानंतर त्याची तीव्रता वाढणे, अशा घटना घडत आहेत. रात्रीच्या वेळी वेगाने वाहन चालविण्याच्या प्रवृत्तीमुळे धोका अधिक वाढत असल्याचे निरीक्षण आहे.

    या पार्श्वभूमीवर रस्ता सुरक्षा समितीने अपघात रोखण्यासाठी कठोर निर्देश दिले आहेत. अतिवेगाने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाई अधिक प्रभावी करण्यासह अति अपघातप्रवण मार्गांवर विशेष लक्ष ठेवणे, रात्रीच्या वेळेतील गस्त आणि वाहतूक नियंत्रण वाढविणे, तसेच अपघातांची कारणे शोधून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला आहे.