जेएनएन, नागपूर: तिरंदाजी मध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या ओजस देवतळेला या वर्षीचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. चीन झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताने 100 पदके मिळवली. त्यात नागपूरच्या ओजस देवतळेने मोठं यश संपादन करत ‘सूवर्ण' कामगिरी केली. ओजसला कंपाऊंड तिरंदाजीत सूवर्ण पदक मिळाले. त्यांनतर सर्वत्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ओजसचे कौतुक केले होते. ओजसला हा पुरस्कार 9 जानेवारी 2024 रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात प्रदान केला जाईल. 


खराट्याच्या काड्यांपासून सुरुवात ते तिरंदाजीत ‘गोल्ड’ 

लहानपणापासूनच तिरंदाजीची आवड असलेल्या ओजसने सुरवातीला खराट्याच्या काड्यांपासून धनुष्य बनवत खेळाचा आनंद घेतला. ओजसची ही आवड लक्षात घेता आई-वडिलांनी त्याला प्रशिक्षण देण्याचे ठरवेल. सुरवातीला नागपुरात सराव केला त्यांनतर, या खेळात समोर जायचे असेल तर चांगल्या सुविधा आणि योग्य प्रशिक्षणाची गरज ओळखून ओजसने सातारा गाठले तिथे प्रशिक्षक प्रवीण सामंत यांच्याकडून त्याने प्रशिक्षण घेतले. आशियाई स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवल्यानंतर नागपूरमध्ये योग्य सुविधा नसल्याने मला सातारा गाठावे लागल्याची खंत ओजसने बोलून दाखवली होती. त्यांनतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. 

तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात 150 पैकी 150 गुण मिळवून सुवर्ण पदक मिळवणारा ओजस हा पहिला कंपाऊंड तिरंदाज आहे. यानंतर, ओजसने  आशियाई क्रीडा स्पर्धेत कंपाऊंड तिरंदाजीमध्ये सांघिक, मिश्र आणि वैयक्तिक गटात सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक केली. इतक्या कमी वयात ओजसला अर्जुन पुरस्कारासारख्या प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर होणे ही संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब आहे.


ओजसला अर्जुन पुरस्कार मिळेल अशी अपेक्षा नव्हती कारण या पुरस्कारासाठी खूप मोठ्या खेळाडूंची नावे यादीत होती. अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यांनतर आम्हा सर्वांना खूप आनंद झाला. त्यांने आतापर्यंत घेतलेल्या मेहनतीचे फळ त्याला मिळाले आहे. ओजसला इतर राज्यातील विद्यापीठांकडून खेळाचे ऑफर देण्यात आले होते ज्यासाठी त्याला एका सुवर्ण पदकासाठी करोडो रुपये ते देणार होते पण, ओजसचा निर्णय ठाम होता की, त्याला महाराष्ट्राकडूनच खेळायचे आहे. आजवर महाराष्ट्रात अशी कामगिरी कोणीही केलेली नाही. ती ओजसने करून दाखवली या मागे त्याचे प्रशिक्षक प्रवीण सामंत यांचे ही मोठे योगदान आहे. अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी जेव्हा ओजसला मिळाली तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा होता. मला अर्जुन पुरस्कार मिळेल अशी अशा मी कधीही केली नव्हती पण, माझी मेहनत फळाला आली असल्याचे ओजसचे मत होते. राष्ट्रपतींच्या हस्ते ओजसला हा पुरस्कार दिला जाणार आहे. मुलाचा हा सम्मान बघण्यासाठी आम्ही सर्व दिल्लीतील राष्ट्रपती भवनात उपस्थित राहणार असल्याचे ओजस देवतळेची आई अर्चना देवतळे यांनी जागरण प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. 

अर्जुन पुरस्कार कोणाला दिला जातो 

    अर्जुन पुरस्कार हा राष्ट्रीय खेळातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल दिला जातो. 1961 मध्ये भारत सरकारने याची सुरू केली. 5 लाख रुपये रोख, कांस्य धातूपासून बनलेला अर्जुनाचा छोटा पुतळा आणि प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. भारत सरकारचे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय राष्ट्रीय खेळांमध्ये उत्कृष्ट यशासाठी अर्जुन पुरस्कार प्रदान करते. राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाते.  

    या खेळाडूंना जाहीर झाला यंदाचा अर्जुन पुरस्कार 

    ओजस प्रवीण देवतळे (तिरंदाजी), आदिती गोपीचंद स्वामी (तिरंदाजी), श्रीशंकर (अ‍ॅथलेटिक्स), पारुल चौधरी (अ‍ॅथलेटिक्स), मोहम्मद हुसामुद्दीन (बॉक्सर), आर वैशाली (बुद्धिबळ), मोहम्मद शमी (क्रिकेट), अनुष अग्रवाल (अश्वशक्ति), दिव्याकृती सिंग (अश्वशक्ति ड्रेसेज), दीक्षा डागर (गोल्फ), कृष्णा बहादूर पाठक (हॉकी), सुशीला चानू (हॉकी), पवन कुमार (कबड्डी), रितू नेगी (कबड्डी), नसरीन (खो-खो), पिंकी (लॉन बॉल्स), ऐश्वर्या प्रताप सिंग तोमर (नेमबाजी), ईशा सिंग (नेमबाजी), हरिंदर पाल सिंग (स्क्वॉश), अहिका मुखर्जी (टेबल टेनिस), सुनील कुमार (कुस्ती), अंतिम (कुस्ती), रोशिबिना देवी (वुशू), शीतल देवी (पॅरा तिरंदाजी), अजय कुमार (अंध क्रिकेट), प्राची यादव (पॅरा कॅनोइंग).