जेएनएन, नागपूर. Anant Chaturdashi: पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना श्री गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधांना गणेशभक्तांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत. शहरात विविध ठिकाणी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावासह फिरते विसर्जन वाहनात पाच दिवसांपर्यंत 6 हजार  261 श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले आहे. तर नऊ दिवसीय आणि दहा दिवसीय (अनंत चतुर्दशी)  श्री गणेश मूर्तीचे विसर्जनाच्या दृष्टीने महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, श्रीमती वैष्णवी बी. यांच्या मार्गदर्शनात घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी शहरातील 216 ठिकाणी 419 कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील फुटाळा तलाव, शुक्रवारी तलाव, सक्करदरा तलाव आणि सोनेगाव तलाव, पोलिस लाईन टाकळी येथे गणपती विसर्जनाला पूर्णपणे बंदी असली असून, याठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहे. या तलावांमध्ये आतापर्यंत 6 हजार 261 घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. याशिवाय कोराडी तलाव, गोरेवाडा, पोलिस लाईन टाकळी येथे मोठ्या गणपती मूर्तीच्या विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. विविध ठिकाणी गणपती विसर्जनाकरिता गणेशभक्त मोठ्या संख्येने येत असून, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी 1065 मनपाचे कर्मचारी कार्यरत आहेत.

याशिवाय गणेश भक्तांसाठी निर्माल्य कुंड व इतर बाबींची गणेशभक्तांना माहिती प्रदान करण्याकरिता ग्रीन व्हिजिल फाउंडेशन आणि रामदेव बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी सुद्धा स्वयंसेवक म्हणून आपली सेवा देत आहे.  शहरातील विविध झोनमधील कृत्रिम तलावात पहिल्या दिवशी 2081, तिसऱ्या दिवशी 862, पाचव्या दिवशी  3318  असे एकून 6261 श्रीच्या मूर्तीचे विसर्जन झाले.  यामध्ये 5788 मातीच्या तर 437 पीओपी श्रीच्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यात आले. 

 सातव्या दिवसाच्या श्रीच्या मूर्ती  विसर्जनासाठी 103 कृत्रिम तलावाची व्यवस्था
सातव्या दिवसाच्या श्रीच्या मूर्ती विसर्जनासाठी 103 कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली होती . यामध्ये लक्ष्मीनगर झोनमध्ये 4 ठिकाणी, धरमपेठ झोन येथे 24 ठिकाणी, हनुमाननगर झोन येथे 8 ठिकाणी आणि धंतोली झोन येथे 2 ठिकाणी, नेहरुनगर झोन आणि आशीनगर झोनमध्ये प्रत्येकी 1 अशा 40 ठिकाणी 103 कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्यात आली  होती.

 फिरत्या विसर्जन वाहनाला उत्तम प्रतिसाद
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिका नागरिकांच्या सोयीसाठी पूर्णपणे सज्ज झाली असून, यंदा पारंपरिक कृत्रिम विसर्जन तलावांसोबतच नागरिकांना घरबसल्या गणेश मूर्ती विसर्जित करता याव्यात, याकरिता मनपाने अनोखा उपक्रम सुरू केला आहे. मनपाद्वारे शहराच्या दहाही झोनमध्ये एकूण २२ फिरत्या विसर्जन वाहनाची  व्यवस्था करण्यात आली आहे. नागरिक देखील या व्यवस्थेला उत्तम प्रतिसाद देत आहेत.

हेही वाचा: Ganesh Visarjan 2025: गणेश विसर्जनाच्या दिवशी  करा या वस्तू दान, वर्षभर घरात राहील सुख-समृद्धी