नागपूर. Maharashtra Winter Session 2025 : महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झालं असतानाही विधानसभेला अद्याप विरोधी पक्षनेता मिळालेला नाही. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून या पदासाठी तातडीची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. दरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)मध्येच मोठी राजकीय हालचाल सुरू झाली आहे.

विरोधीपक्ष नेते पदावर ठाकरे गटाने यू टर्न घेतला आहे-

ठाकरेंच्या शिवसेनेकडून पावसाळी अधिवेशनात भास्कर जाधव यांचं नाव अधिकृतरीत्या विरोधी पक्षनेतेपदासाठी विधानसभेला देण्यात आले होते. मात्र,अचानक पक्षात आता आदित्य ठाकरेंचं नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी पुढे करण्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे भास्कर जाधवांच्या नावावर फुली मारण्यात आली आहे, अशी माहिती समोर आली आहे. कालच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी आदित्य ठाकरे यांचे नाव देण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. सत्ताधाऱ्यांनीही ही उद्धव ठाकरेंची राजकीय खेळी असल्याचा आरोप केला आहे.

माझा दावा एका मिनिटात मागे घेईन-भास्कर जाधव 

दरम्यान, भास्कर जाधव यांच्याकडून या घडामोडींवर प्रतिक्रिया आलेली आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, जर पक्षाने आदित्य ठाकरेंची निवड केली, तर मी माझा दावा एका मिनिटात मागे घेईन. पक्षाच्या निर्णयावर मला काहीही हरकत नाही. त्यांच्या या भूमिकेमुळे नाराजीचे सूर कमी झाले असले तरी, आतल्या गोठातील अस्वस्थता लपलेली नाही.

विरोधी पक्षनेते पदावरून वातावरण तापणार -

    सध्या सरकार आणि विधानसभा अध्यक्षांकडून १० टक्के सदस्यसंख्येच्या अटीचा मुद्दा पुढे करत विरोधी पक्षनेतेपदाची नियुक्ती फेटाळली असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. आज पुन्हा विरोधी पक्षनेते पदावरून हिवाळी अधिवेशनात वातावरण तापण्याची शक्यता आहे.