जेएनएन, मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत महत्त्वाचे संकेत दिले असून, महापालिका निवडणुकांनंतर झेडपी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला जाईल, असे सूतोवाच पवार यांनी केले आहे.
अजित पवार यांनी स्पष्ट केले की, 50 टक्के आरक्षण मर्यादेच्या आत येणाऱ्या झिल्हा परिषदांच्या निवडणुका आधी घेण्यात येऊ शकतात, तर ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची टक्केवारी 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, त्या ठिकाणी निवडणुका पुढील टप्प्यात घेण्याचा विचार सुरू आहे. त्यामुळे राज्यात झेडपी निवडणुका दोन टप्प्यांत होण्याची शक्यता बळावली आहे.
सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार 50 टक्के आरक्षणाची अट महत्त्वाची ठरत आहे. याच कारणामुळे अनेक जिल्ह्यांतील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका रखडल्या आहेत. हा कायदेशीर अडसर दूर करण्यासाठी राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाकडून विविध पर्यायांचा विचार सुरू आहे.
महापालिका निवडणुका पूर्ण झाल्यानंतर लगेचच 50 टक्के आरक्षण मर्यादेत येणाऱ्या झेडपींच्या निवडणुका घेण्याचा पहिला टप्पा जाहीर केला जाऊ शकतो. त्यानंतर उर्वरित झेडपींसाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर दुसऱ्या टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, झेडपी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. संभाव्य युती, आघाड्या आणि जागावाटपाबाबत चर्चा सुरू असून, दोन टप्प्यांत निवडणुका झाल्यास राजकीय रणनीतीवरही त्याचा मोठा परिणाम होणार आहे.
हेही वाचा: Maharashtra civic polls 2026:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत उत्साह; राज्यभरातून 33,606 अर्ज दाखल
